
कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासातील हा सुवर्णक्षण;
कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटन समारंभ १७ ऑगस्ट रोजी
तब्बल ४२ वर्षांच्या संघर्षानंतर अखेर कोल्हापूर सर्किट बेंचला मंजुरी मिळाली असून, त्याचा उद्घाटन समारंभ येत्या १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता मेरी वेदर ग्राउंडवर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या बेंचचे उद्घाटन होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हावे, यासाठी हा समारंभ सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र, उपस्थितांनी शिष्टाचार पाळणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रोटोकॉल समितीने अलीकडेच कोल्हापूर येथे पाहणी करून सुरक्षा, वाहतूक, पार्किंग, व्यासपीठावरील व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि अग्निशामक यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे व पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या उपस्थितीत आवश्यक कामांचा आढावा घेण्यात आला असून, त्या युद्धपातळीवर सुरू आहेत.
समारंभ सुरू होण्याच्या अर्धा तास आधी उपस्थितांनी जागेवर पोहोचणे आवश्यक आहे. कोणत्याही घोषणा देणे किंवा अनुचित प्रकार करणे कडक बंदीस्त असेल. पोलिसांच्या सूचनांचे पालन बंधनकारक असेल. न्यायमूर्ती व मान्यवरांच्या जवळ जाणाऱ्या व्यक्तींना पास घेणे बंधनकारक ठेवले आहे. सहा जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, आजी-माजी न्यायाधीश, ज्येष्ठ वकील, प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाणार आहे. वकिलांसाठी ऑनलाइन नोंदणीची सोय उपलब्ध आहे.
दरम्यान, कोल्हापूर सर्किट बेंच सुरू झाल्यानंतर ८५ हजारांहून अधिक प्रलंबित खटले या बेंचवर दाखल होणार असून, यामुळे पुणे, मुंबई आणि इतर बेंचवरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच, निवडणूक आणि करासंबंधीचे अर्ज व याचिका आता थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्येच दाखल करता येणार आहेत.
कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासातील हा सुवर्णक्षण ठरणार असून, जिल्हा प्रशासन, न्यायालयीन यंत्रणा आणि पोलिस दल उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज झाले आहेत.