logo

कोकणात मुसळधार पाऊस; रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा

मागील तीन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शनिवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अनेक नद्या व ओढ्यांना पूर आला असून खालच्या भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर, दापोली, खेड व मंडणगड या तालुक्यांत मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागले आहे. विशेषतः चिपळून, खेड, संगमेश्वर व राजापुरात खालच्या भागांमध्ये पाणी साचल्याने रहदारीवर परिणाम झाला. शहरासह ग्रामीण भागांत दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

सिंधुदुर्गातही सावंतवाडी, कुडाळ, मालवण परिसरात मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. काही गावांत वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोडामार्ग व कणकवली तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असल्याने मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाने रविवारी (१७ ऑगस्ट)ही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक भागांत दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. लाल व नारंगी सतर्कतेचा इशारा देत नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सलग तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या तुडुंब भरल्या असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

10
1079 views