तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत जनता विद्यालय, पिंपळगाव सराईची चमकदार कामगिरी
राष्ट्रीय सैनिक स्कूल येथे २५ व २६ नोव्हेंबर रोजी आयोजित बुलडाणा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत पिंपळगाव सराई येथील जनता विद्यालयाने चमकदार यश मिळवत आपला ठसा उमटविला. विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी उत्कृष्ट कौशल्य आणि विज्ञानविषयक जाण दाखवत लक्षवेधी कामगिरी केली.या प्रदर्शनीत इयत्ता ९ वीचे विद्यार्थी वेदांत सुरेश घोलप याने निबंध स्पर्धेत प्रभावी मांडणी सादर करून प्रोत्साहन पारितोषिक पटकावले. तर इयत्ता १० वीतील ईश्वर अनिल सिरसाट याने प्रश्नमंजुषा स्पर्धेत उल्लेखनीय ज्ञानप्रदर्शन करत द्वितीय क्रमांक मिळविला.विद्यालयाचे विज्ञान शिक्षक सुहास कुलकर्णी यांनी ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती – माध्यमिक गट’ या स्पर्धेत नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त शैक्षणिक साहित्य सादर करून द्वितीय क्रमांक मिळवत शिक्षकांसाठीही प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.या यशामुळे विद्यालयात उत्साहाचे वातावरण पसरले असून विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजेत्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराजजी भाला, जनता विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे, पर्यवेक्षक संजय पिवटे तसेच सर्व सहकारी शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या उल्लेखनीय कामगिरीमुळे पिंपळगाव सराईच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून विज्ञान उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.