
रागाच्या भरात मुलीचा गळा दाबला अन् रात्रीच अंत्यविधी उरकला; परभणी ऑनर किलिंगची इनसाइड स्टोरी
परभणी :- (नितीन थोरात प्रतिनिधी ) राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असताना परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक घडली आहे. पालम तालुक्यातील नाव्हा गावात प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर पालकांनी इतरांच्या मतदीने मृतदेह जाळून पुरावा देखील नष्ट केला. २१ एप्रिल रोजी झालेल्या या घटनेची माहिती पोलिसांना एका गोपनीय खबऱ्याकडून मिळाली आणि त्यानंतर हे प्रकरण समोर आले.
पालम तालुक्यातील नाव्हा येथील १९ वर्षीय युवतीचे गावातील दुसऱ्या जातीतील युवकासोबत प्रेम संबंध जुळले. दोघांमध्ये प्रेमाच्या आणा-भागा देखील झाल्या. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलीचे दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेम संबंध जुळले असल्याचे मुलीच्या आई-वडिलांना कळाले. आपल्या मुलीला आई-वडिलांनी समजून सांगण्याचा प्रयत्न देखील केला. पण मुलीने त्या मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आई-वडिलांनी समजूत काढूनही मुलगी ऐकायला तयार नव्हती.२१ एप्रिलच्या रात्री दहाच्या दरम्यान आपल्या मुलीला आई वडील समजावून सांगत होते. तो मुलगा दुसऱ्या जातीतला आहे आपल्या कुळाला बट्टा लागेल. आम्हाला हा विवाह मान्य नाही तू तो विषय मनातून काढून टाक, असे आपल्या मुलीला सांगत होते. पण मुलीने निश्चय केला होता ती त्या मुलासोबतच लग्न करणार असल्याचे आपल्या आई-वडिलांना सांगत होती. वडिलांना राग अनावर झाला आणि रागाच्या भरात वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून केलारागाच्या भरात मुलीचा खून झाल्यानंतर मात्र आई-वडील बिथरले. आपल्या भावकीतील जवळच्या लोकांना त्यांनी बोलवून घेतले. भावकीतील लोकांनाही हा विषय माहीत होता. ही गोष्ट बाहेर फुटू नये म्हणून मुलीचा अंत्यविधी भावकितील काही व्यक्तींना सोबत घेऊन त्याच रात्री नाव्हा येथील मराठा स्मशानभूमीत उरकण्यात आला. हिंदू रीतीने वाजप्रमाणे मुलीचे प्रेत जाळून टाकण्यात आले.पण सदरील घटना मात्र लपवू शकली नाही. पोलिसांच्या गोपनीय खबऱ्यांकडून पालम पोलिसांना ही माहिती कळाली. पालम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेकर यांनी रीतसर गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासाची सूत्रे फिरली आणि सर्व प्रकार समोर आला. पालम पोलीस ठाण्यात मुलीच्या आई-वडिलांसह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचा खून करून तिचे प्रेत जाळल्या प्रकरणी आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील घटना पूर्ण माहीत असतानाही अंत्यविधीसाठी उपस्थित राहून खुनाचा गुन्हा लपविल्या प्रकरणी भावकीतील अन्य सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील करीत आहेत.