
# सावधान #
!! पानी पीजिए छान के , गुरु कीजिए जानके !!
# सावधान #
!! पानी पीजिए छान के , गुरु कीजिए जानके !!
गुरू का करावा ? कुणी करावा ? गुरू करण्याची गरज काय ? गुरू करणे आवश्यक आहे का ? का आवश्यक आहे गुरू करणे ? गुरू पदाचे पात्रता निकष काय असावे ? दीक्षा घेणाऱ्यांचे काय ? आपण मानसिक स्वस्थ आहोत का ? ( विशेषतः गुरू करते वेळी ) आपण गोंधळलेल्या अवस्थेत तर नाहीत ना ? आपण कुणाच्या दबावात आग्रहात तर गुरू करत नाही आहात ना ? आपण कोणत्या आकर्षणात येऊन तर गुरू नाही ना करत आहात ? आपली मानसिक अवस्था भरकटलेली तर नाही ना ? खूप लोकांनी गुरू केला म्हणून तुम्ही गुरू करणार का ? शिष्य समुदायाच्या प्रचाराला बळी तर नाही ना पडलात ?
आता आपण म्हणाल या आणि इतक्या प्रश्नांच्या सरबत्ती ची इथे प्रासंगिकता काय ? ....तर हो या सर्व प्रश्नांचा विचार करूनच या पायरी वर पाय ठेवायची निदान आज तरी गरज आहे . आणि मी हमखास सांगतो वर मी सांगितलेल्या गुरू करण्याच्या कारणांपैकी कुठलं ना कुठलं कारण निश्चितच आहे .
गुरू केल्याने काय फरक पडतो ? तपासून बघाच !
तुमचा स्वार्थ गळून पडला का ? तुमची शत्रुबुद्धी निवळली का ? राग , लोभ , मोह , मद , मत्सर , द्वेष , याचा तुम्ही त्याग केला का ? ईश्वर कळला का ? भक्ती कळली का ? परिवार समाज राष्ट्र आणि वसुधैव कुटुंबकम काय आहे कळलं का ? तुमच्यातल्या उणीवा दूर झाल्यात का ? तुमच्यातली नकारात्मकता किती दूर झाली आणि तुमच्यात किती सकारात्मकता वाढली ? गुरू चा उपयोग तुमच्या जीवनात कसा करणार आहात ? ही अनेक प्रश्न अनुत्तरित राहता कामा नये . जर ही प्रश्न अनुत्तरित राहिलीच तर मग गुरू कशासाठी केला ? याच्यावर सखोल चिंतन करता येईल का ? ते बघा जमलंच तर .
आजचे हे गुरू नवीन आणि स्वतःचे असे काय तत्वज्ञान सांगणार तुम्हाला जे आधीच तुमच्या आई वडिलांनी तुमच्या अवती भवतीच्या थोरामोठ्यांनी नाही सांगितलं ? असे कुठले वेगळं ज्ञान देतील जे आपल्या ग्रंथ संपदेत नाही , अभंगांमध्ये नाही , भक्ती साहित्यात , पुराणात नाही ?
ज्ञान घेण्याची तयारी असली तर ते आपण आपल्या अवतीभवती उभ्या वृक्षा कडून , वाहत्या नदी कडून , झऱ्या कडून , विहिरिकडून, आकाशा कडून अग्नी कडून रस्त्यापासून दिव्यापासून कीटक मुंगी कुत्रा प्राणी भिक्षेकरी अशाच कित्येक घटकांपासून आणि समाजात क्षणाक्षणाला घटित घटनांवरून बऱ्या वाईट अनुभवांवरून आपण शिकू शकतो .
फक्तं कुणाकडून काय घ्यावं हे समजून उमजायला येणं गरजेचं आहे आणि मी म्हणतो इतकी बुद्धी आम्हाला ईश्वराने देऊनही आम्ही आसाराम बापू सारखे रामपाल सारखे असे कित्येक अलाने फलाने स्वयंघोषित संत स्वयंघोषित गुरूंना आपला समाज शरण जातो . अश्या स्वयंघोषित संतांनी गुरूंनी समाजात आपली पाळेमुळे घट्ट करून बसलेले आढळून येतात . यांचे कर्मकांड जगासमोर उघडे पडलेत हे वेगळे सांगायला नको . मी कित्येक उच्चशिक्षित प्रतिष्ठित उच्चभ्रू लोकांना शिक्षक शिक्षिकांना यांच्या नादी लागलेले बघितलेले आहे . आपल्या मृत जन्मदात्या माता पित्याच्या तसबिरीसमोर कधी ढंगाने तेलाचा दिवा लावला नसेल पण या स्वयंघोषित गुरूंच्या मोठ्ठाल्या तसबिरी फोटो फ्रेम लोकं आपल्या दर्शनी भागात बैठकीच्या खोलीत लावून असली तुपाचा दिवा ना चुकता प्रतिदिन लावायचात यांचा शिष्य समुदाय . पण हे महाशय कोणते दिवे लावत सुटले हे जगाने पाहिले . अलीकडे काही धूर्त आमच्या शास्त्र पुराणांना संत साहित्याला आव्हान देऊन स्वतःला ईश्वर प्रेषित करीत सुटलाय तो निःशुल्क पुस्तक वाटत फिरतोय रामपाल . माझी या अश्या आसाराम बापू व तत्सम महानुभावांबद्दल त्यांच्या शिष्यांसोबत कित्येकदा पंधरा वीस वर्षांपूरवीपासून (जनजागरण) अनुषंगाने वाद व्हायचेत...आज तेच लोकं तोंड लपवतात .
मी म्हणतो शिष्यांच्या सांसारिक समस्या असंख्य आहेत तूम्ही धड शंभर शिष्यांचं व्यक्तिगत समाधान करू शकत नाही धड शंभर शिष्यांचे कल्याण करू शकत नाही तिथे हजारोंच्या संख्येत लाखोंच्या संख्येत शिष्य समुदायाची तुम्हाला गरज काय ? आणि मग त्यांच्यातही गटबाजी ही आलीच उच नीच जवळचा दूरचा भेद आलाच .
अहो आजकालचे स्वयंघोषित गुरू महाराजांनो तुमची स्पर्धा आहे तरी कुणाशी ? नुसते शिष्य संख्या वाढवत चाललेत . तुम्हाला काय दाखवायचं आहे या समाजाला ? तुम्ही आदिगुरू जगद्गुरु शंकराचार्यांच्या पेक्षा संत ज्ञानदेवांपेक्षा नामदेवांपेक्षा नवनाथांपेक्षा खूप मोठे गुरू संत म्हणू स्वतःला सिद्ध करायचं की काय ?
मला असं का वाटतं की आजचे हे गुरू स्वतःच भरकटलेले आहेत यांनाच दिक्षेची चांगल्या सद्गुरूंची गरज आहे .
आधी शिष्य समुदाय वाढवायचा आणि नंतर आपल्या कुत्सित उद्दिष्टांना विस्तार देण्यास गल्ली ते दिल्ली पर्यंतचे आपापल्या क्षमतेने राजकारण राजनैतिक हस्तक्षेप करणे आपल्या शहराचे, राज्याचे ,देशाचे राजकारण प्रभावित करण्याचे सामर्थ्य एकवटण्याचे कटकारस्थान रचण्याचे केंद्र यांचे आश्रम बनतात . डेरा सच्चा सौदा बाबा राम रहीम आसाराम बापू रामपाल सारखे जिवंत उदाहरण आहेच .
शीख संप्रदायात दहा गुरुंनंतर तेव्हापासून समाजातील थोर संत महात्म्यांची उद्बोधनं , श्लोक , अभंग यांना आपल्या गुरू ग्रंथ साहेब ज्याला म्हणतात त्यात संकलित करून गुरू ग्रंथ साहेब यापुढे गुरुस्थानी मानायचे असा आदेश शिखांचे दहावे गुरु गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या शिष्य समुदायाला दिला अंदाजे सतराव्या शतकात . किती आदर्श व्यवस्था स्वीकारली या समाजाने किंवा संप्रदायाने . खरंच ग्रंथ आमचे गुरू आहेत ...
गुरू करायच्या गरजा खूप विशिष्ट असतात असा माझा समज १) आध्यात्मिक उन्नती २) ध्यानधारणा ३) योगोपासना ४) तंत्र साधना ५) मंत्र साधना ६) यंत्र साधना ७ ) कुंडलिनी जागरण अश्याच काही साधनांकरिता त्या क्षेत्रातील ख्यातीप्राप्त मातब्बर अनुभवी गुरूंची गरज असते .
भुलचुक क्षमा असावी
आपला !
रामेश्वर दा. जिराफे भावसार
नागपूर .