
Child Marriage : बालविवाहानतर
झाली अल्पवयीन मुलीची प्रसूती; पती पालकांवर पोक्सोसह गुन्हे दाखल
Child Marriage : साडेपंधरा वर्षांच्या मुलीचा विवाह
झाल्यानंतर ती प्रसूतीला गेली आणि तिला मुलगा झाला. या प्रकरणात वेदांतनगर पोलीसांनी पोक्सो कायद्यानुसार मुलीच्या पती, सासू आणि आईवडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला
छत्रपती संभाजीनगर : साडेपंधरा वर्षांच्या मुलीचा विवाह
केल्यानंतर ही मुलगी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. हा प्रकार समजताच वेदांतनगर पोलिसांनी स्वतः तक्रारदार होत मुलीचा पती, सासू आणि मुलीच्या आईवडिलांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार बलात्कार आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रांतीनगर भागातील एक अल्पवयीन मुलगी घाटी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली असून तिला मुलगा झाला असल्याची एमएलसी पोलिस ठाण्यात पाठविण्यात आली. १६ नोव्हेंबर रोजी ही एमएलसी पाठवण्यात आली होती.
याप्रकरणी निरीक्षक यादव यांनी चौकशी केली. यामध्ये २६ वर्षांच्या मुलाचा विवाह देऊळगाव राजा रोड, जालना येथील एका दांपत्याच्या मुलीसोबत १७ डिसेंबर २०२३ ला झाल्याची माहिती मिळाली. यावेळी या मुलीचे वय १४ वर्षे ५ महिने होते.
मुलगी अल्पवयीन असताना देखील तिचा विवाह लावण्यात आला. तसेच, पतीला देखील ती अल्पवयीन असल्याची माहिती असूनही त्याने शारीरिक संबंध ठेवल्यामुळे ती गर्भवती राहून तिची प्रसूती झाली. हा गुन्ह्याचा प्रकार असल्यामुळे निरीक्षक यादव यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार महिला जमादार सुनीता राजू जाधव यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी पती, सासू, मुलीचे आईवडील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय संगीता गिरी याप्रकरणी तपास करीत आहेत.