logo

पहिला मराठी इंडो-जर्मन चित्रपट: मराठी चित्रपटसृष्टीत नवी क्रांती घडवणार.

नांदेड मधील नवोदित कलाकारांना मिळणार चित्रपटात काम करण्याची संधी

नांदेड: प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते रमेश होलबोले त्यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. धीस साइड ऑफ पॅराडाईस हा चित्रपट केवळ होलबोले यांच्यासाठीच महत्त्वाचा टप्पा नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण आहे, कारण हा मराठी चित्रपटाच्या इतिहासातील पहिला इंडो-जर्मन सहयोगी प्रकल्प आहे. धीस साइड ऑफ पॅराडाईस हा चित्रपट प्रल्हाद काळे यांच्या फोल्क्सफिल्म्स इंडिया प्रा. लि. यांच्याद्वारे निर्मित होत असून, त्यासाठी जर्मन निर्मिती संस्था लाइटनिंग अँड थंडर यांचे सहकार्य लाभणार आहे. सध्या हा चित्रपट प्री-प्रॉडक्शन टप्प्यात असून, कास्टिंगची प्रक्रिया महाराष्ट्रातील चार प्रमुख शहरांमध्ये ऑडिशन्सद्वारे सुरू झाली आहे. नांदेड येथील सिनेस्टार अकॅडमी येथे या ऑडिशन्स सुरू झाल्या आहेत दिनांक 30 व 31 मार्च रोजी हे ऑडिशन्स चालणार आहेत या ऑडिशन्स मध्ये जास्तीत जास्त नांदेड येथील युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन चित्रपटाचे निर्माते प्रल्हाद काळे व जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक रमेश होलबोले यांनी केले. या ऑडिशन्स मधून अनेक नवोदित कलाकारांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार आहे. ही संधी कोणासाठी तरी स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा ठरणार आहे, तर कोणासाठी आपल्या कलागुणांना नवी दिशा देणारा प्रवास असेल असे मत निर्माते प्रल्हाद काळे यांनी व्यक्त केले. ऑडिशन्स पूर्ण झाल्यावर लवकरच मुख्य चित्रीकरण सुरू होईल असे त्यांनी सांगितले. होलबोले यांचा जर्मनीशी असलेला संबंध हा या अनोख्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा पाया आहे. होलबोले यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधून 2020 मध्ये दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी फिल्मअकॅडेमी बाडेन-वुर्टेमबर्ग, जर्मनी येथे आंतरराष्ट्रीय वर्ग (ICLA) प्रोग्राम अंतर्गत आपले कौशल्य अधिक परिष्कृत केले.
फोल्क्सफिल्म्स इंडिया प्रा. लि. चे संस्थापक प्रल्हाद काळे आणि व्यवस्थापकीय संचालक रमेश होलबोले यांनी आपल्या या प्लॅटफॉर्मचा उपयोग नेहमीच सामाजिक व सांस्कृतिक विषयांना वाचा फोडण्यासाठी केला आहे. रमेश होलबोले यांच्या प्रभावी कथा-कथन शैलीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आगासवडी व्हिलेज इन द स्काय या लघुपटास अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. धिस साइड ऑफ पॅराडाईस या चित्रपटाच्या माध्यमातून ते सर्जनशील सीमारेषा विस्तारित करण्यासह महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत. या ऑडिशन्सचे उद्घाटन ओझोन फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉ. संदीप काळे यांच्या हस्ते झाले.
उद्घाटक म्हणून या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो. मराठी चित्रपटसृष्टीच्या भविष्यासाठी हा उपक्रम एक महत्वपूर्ण पाऊल आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीसाठी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, यात शंका नाही. मराठी सिनेमा हा नेहमीच आपल्या समृद्ध परंपरा, सशक्त कथा आणि हृदयस्पर्शी अभिनयामुळे ओळखला जातो. आता या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टी नव्या क्षितिजांचा वेध घेत आहे असे प्रतिपादन चित्रपटाचे निर्माते प्रल्हाद काळे यांनी केले. भारत आणि जर्मनी या दोन समृद्ध कलासंस्कृतींचा संगम या चित्रपटात पहायला मिळेल, हे निश्चितच उत्साहवर्धक आहे. हा प्रयोग केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता दोन देशांतील कलात्मक विचारसरणी, सौंदर्यदृष्टी आणि समाजभावनांची देवाणघेवाण घडवेल. तसेच, हा चित्रपट जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचून मराठी सिनेमाच्या वैशिष्ट्यांना अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देईल असे प्रतिपादन दिग्दर्शक रमेश होलबोले यांनी केले. याप्रसंगी सिनेस्टार अकॅडमीचे संचालक दिनेश कवडे, जर्मनी येथील चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शक नेन स्कोर्डर, प्रसिद्ध सिने अभिनेते संतोष वडगीर, गौतम थोरात, सुमित गवते, गणेश बुरगड, डॉ. नागेश काळे, माणिक गोरे आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

13
8505 views