logo

चिखली तालुक्यातील.जिजाऊंच्या दोन कर्तृत्ववान सुनांचे करवंड येथे स्मारक व्हावे : ॲड.जयश्री शेळके!!!


चिखली : मन्सूर शहा.:---
तालुक्यातील करवंड या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती घराण्याच्या दोन कर्तृत्ववान सुनांचे हे माहेर आहे. याठीकाणी त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्ता (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ॲड.जयश्री शेळके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्यामार्फत निवेदनाद्वारे 15 एप्रिल रोजी केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड हे गाव आजही ५२ बुरुजी गाव म्हणून ओळखले जाते. या गावची अजून एक महत्वाची ओळख म्हणजे माँसाहेब जिजाऊ यांच्या सहाव्या सुनबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी राणी गुणवंताबाई राजे भोसले आणि तंजावरचे राजे छत्रपती व्यंकोजी राजे यांच्या पत्नी राणी दिपाताई राजे यांचे माहेर म्हणजे करवंड ! या दोघीही येथील इंगळे परिवाराच्या कन्या होत्या. आजपर्यंत चिखली तालुक्यातील जिजाऊ माँसाहेबांच्या दोन कर्तृत्वान सुनांचे माहेर करवडं हे गाव प्रकाशझोतापासून दूरच होते.
करवंड गावामध्ये आधी ५२ बुरुज होते. परंतु सद्यस्थ‍ित फक्त तीन ते चार बुरुज शिल्लक आहेत. काळाच्या ओघात गावातील तसेच परिसरातील लोकांनी बुरुजांच्या मातीचा उपयोग घर बांधकामासाठी केला आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बुरुजांचे नुकसान झाले आहे. यापुर्वी कोणीही या ऐतिहासिक स्थळांची दखल न घेतल्याने पुरातत्व विभागही यापासून अनभिज्ञ होता. पुरातत्व विभागालाही याची कुठलीही माहिती नव्हती. ज्यामुळे बुरुजांची योग्य ती दुरुस्ती देखभाल आजवर केली गेलेली नाही. पर्यायाने कळत नकळत ऐतिहासिक ठेवाच नष्ट करण्यात आला आहे. परंतु याविषयी ५२ बुरुजी करवंड वतनातील परिसरात नव्याने संशोधन केल्यास अनेक संदर्भ इतिहासात मिळू शकतात. स्वराज्याप्रति स्वामिनिष्ठ असलेल्या या इंगळे घराण्याचा इतिहास उलगडणे अधिक महत्वाचे आहे.
करवंड येथील इंगळे घराणे हे सुमारे 300 वर्षांपूर्वी तंजावरला गेल्यामुळे त्यांचे करवंड येथील वतन दुर्लक्षित राहिले. आज करवंड येथील इंगळे घराण्याच्या छत्रपती शिवरायांवरील निष्ठेचा आणि भोसले घराण्याच्या सुनांचा वारसा सांगणारे गढि, बुरुज आणि तत्कालीन अवशेष हे संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांच्या या दोन्ही सुनांचा आणि घराण्याचा इतिहास प्रकाशात आला पाहिजे. त्यामुळे करवंड या गावचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन शासनाने राणी गुणवंताबाई राजे भोसले आणि राणी दिपाताई या छत्रपती घराण्याच्या दोन सुनांचे स्मारक उभारावे. तसेच जिल्ह्याच्या वैभवात भर घालावी अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्ता (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ॲड.जयश्री शेळके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी, बुलडाणा यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.

0
0 views