logo

कर्करोग निर्मूलनाची जनजागृती व उपचार सेवेचे कार्य भविष्यात देखील सुरूच राहणार


* नागपूर
जिल्हा प्रतिनिधी चंदू मडावी
नागपूर कळमेश्वर
मिळालेल्या माहितीनुसार
कर्करोग निर्मूलनाचे, जनजागृतीचे व उपचार सेवेचे कार्य भविष्यात देखील सुरूच राहणार..*


• कळमेश्वर येथील कर्करोग निदान व उपचार शिबिरात 536 कर्करोग संशयितांची तपासणी.
• आमदार डॉ आशिषराव देशमुख यांचे कॅन्सरमुक्त अभियान.


"ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा रोड नागपूरच्या सुपरस्पेशालिटी विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध करून देऊ, जेणेकरून या परिसरातील रुग्णांच्या आरोग्य विषयक समस्यांवर आळा बसेल. कळमेश्वर येथे काही घरांमधील लोकांचे कर्करोग विषयक सर्वेक्षण झाले नसेल तर लता मंगेशकर हॉस्पिटलच्या परिचारीकांची चमू लवकरच ते सर्वेक्षण करेल आणि उर्वरित संशयित रुग्णांची तपासणी करून गरजूंना उपचार देण्यात येतील. तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन घातक असून व्यसनमुक्तीसाठी आपण सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. कर्करोग निर्मूलनाचे उद्दिष्ट आपण लवकरच साध्य करू. त्यासाठी आपले प्रयत्न कायम राहणार असून कर्करोगाबद्दल जनजागृतीचे व उपचार सेवेचे कार्य भविष्यात देखील सुरूच राहील", असे प्रतिपादन आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे 19 एप्रिलला आयोजित कर्करोग निदान व उपचार शिबिरात केले.

आमदार डॉ आशिषराव देशमुख आयोजित कॅन्सरमुक्त अभियानांतर्गत कळमेश्वर येथील शिबिरात विविध विभागातील 536 रुग्णांची तपासणी करण्यात आली. कर्करोगाची स्पष्ट लक्षणे आढळलेल्या 129 रुग्णांना पुढील उपचारासाठी रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, हिंगणा रोड, नागपूर, लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (रुग्णालय) येथे रेफर करण्यात आले आहे.

डॉ निवृत्ती राठोड (सिव्हिल सर्जन, नागपूर), रोटरीच्या अध्यक्षा डॉ प्रतीक्षा मई, डॉ राजीव पोतदार, डॉ दिपाली कुलकर्णी (तालुका आरोग्य अधिकारी, कळमेश्वर), डॉ शमीन शेख (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर) डॉ सुश्रुत फुलारे, डॉ विनय हजारे, प्रगतीताई मंडल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी डॉ आशिषराव देशमुख यांच्या कॅन्सरमुक्त अभियानाची स्तुती केली व कर्करोगाबद्दल जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले. रणजीत देशमुख दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अभय कोलते यांनी यावेळी कॅन्सरमुक्त अभियानाची माहिती दिली.

कॅन्सरमुक्त अभियानाअंतर्गत सावनेर, बडेगाव, धापेवाडा, खापा, तिष्टी, केळवद, गोंडखैरी, पाटणसावंगी, मोहपा, चिचोली व कळमेश्वर अशा 11 ठिकाणी 17 फेब्रुवारी 2025 ते 19 एप्रिल 2025 पर्यंत आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्यातर्फे कर्करोग निदान व उपचार शिबिर मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावनेर व कळमेश्वर तालुक्यांमध्ये आशा वर्कर, परिचारिका व अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन कर्करोगाबद्दल माहिती दिली, जनजागृती केली व कर्करोगाची लक्षणे असलेल्या तसेच तंबाखूजन्य व्यसनी लोकांना या शिबिरांमध्ये तपासणी व निदान चाचण्यांसाठी पाठविले. महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगाची तपासणी व निदान चाचण्यादेखील या शिबिरांमध्ये करण्यात आल्या.

19 वर्षाखालील मुलींसाठी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक एचपीव्ही लसीकरणाची सोय माझी माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ आयुश्री आशिषराव देशमुख यांनी उपलब्ध करून दिली. त्यांनी सुद्धा महिलांमधील कर्करोगाबद्दल जनजागृतीचे महत्वाचे काम केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, शासकीय दंत महाविद्यालय नागपूर, सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर, जिल्हा परिषद नागपूर (आरोग्य विभाग), नगर परिषद आरोग्य विभाग सावनेर, कळमेश्वर, रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, हिंगणा रोड, नागपूर, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर व कळमेश्वर तालुक्यात कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात आले. यात विविध विषयांवरील तज्ञांनी आपल्या सेवा प्रदान केल्या. कर्करोगाशिवाय इतर आजाराच्या रुग्णांची सुद्धा तज्ञांनी तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरांत परिसरातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.

165
6480 views