राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण विभागातील घोटाळ्याप्रकरणी ED कडून दखल; आरोपींचा तपशील मागितला
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याची दखल आता ईडीने घेतली आहे. या घोटाळ्यासंदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत, रिमांडची कॉपी, आरोपींचे बयान, आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील आणि आतापर्यंत तपासातील इतर माहिती ईडीने पोलिसांकडून मागितली आहे. त्यामुळे या घोट्याळ्याशी संबंधितांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शालार्थ आयडी घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास करण्यात येत आहे. सायबर पोलिसांनी एनआयसी आणि महाआयटी सर्वरकडून या घोटाळ्या संदर्भात माहिती मागितलेली आहे. दरम्यान राज्य सरकारने ही शिक्षण क्षेत्रातून या एसआयटीच्या माध्यमातून तपास करण्यात यावा, अशी मागणी होत असताना याच प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत.जो संस्थाचालक दोषी त्याला अजिबात सोडू नका- विजय वडेट्टीवार शिक्षक घोटाळा मोठा आहे. ईडीने, एसआयटी किंवा निवृत्त न्यायाधीश यांनी चौकशी करावी. जो संस्थाचालक दोषी आहे. जे दोषी आहे. त्याला सोडू नका. घोटाळा केला त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण निरपराध माणसाला यात शिक्षा देऊ नका, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. नेमकं प्रकरण काय?नागपुरातील 580 शिक्षक भरती घोटाळ्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त करण्यात आल्याचा काळाबाजार उघड झाला आहे. दरम्यान, या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली असून प्रशासनाला कारवाईचे सक्त आदेश देण्यात आलेले आहे. बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन सरकराला कोट्यवधीची चुना लावण्यात आल्याचे उजेडात आले आहे.बोगस शिक्षकांशी संबंधित शालार्थ आयडी म्हणजेच त्यांचा वेतन देण्यासाठीच्या संगणिकृत प्रक्रिये संदर्भात अनेक डिव्हाईस लोकेशन्सवरून वेगवेगळ्या आयपी ऍड्रेसद्वारे वापरले गेल्याचे दिसून येत आहे. तर मोठ्या संख्येने वेगवेगळे लोकेशन्स किंवा आयपी ऍड्रेस किंवा डिवाइस वापरले गेल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. त्यामुळे सायबर सेल समोर या घोटाळ्याचा तपास करणं एक मोठं आव्हान होऊन बसले आहे. या प्रकरणी एकट्या नागपूर विभागात झालेल्या 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तर प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याच्या नोंदीही आता पोलीस तपासणार असल्याची माहिती आहे.