logo

नागपूरमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गँगवॉरचा भडका, प्रवेश गुप्ता न सापडल्याने अविनाश भुसारींना गोळ्या घालून संपवलं.

नागपूरच्या प्रख्यात सोशा रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. तर आणखी सहा संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. अविनाश भुसारी यांची हत्या (Avinash Bhusari Murder) टोळीयुद्धातून घडल्याचा माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील तपास आणखी पुढे जाईल तशी आरोपींची संख्या वाढू शकते, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल माखनीकर यांनी दिली. त्यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या हत्याप्रकरणाच्या तपासाचा तपशील प्रसारमाध्यमांसमोर मांडला. मारेकरी प्रवेश गुप्ता (Pravesh Gupta) याला मारण्यासाठी आले होते. मात्र, तो हाती न लागल्याने मारेकऱ्यांनी अविनाश भुसारी यांना गोळ्या घालून ठार मारल्याचे पोलिसांनी सांगितले. (Nagpur Crime news)

पवन हिरेणवार हत्याप्रकरणातील (Pawan Hiranwar Murder Case) आरोपींना मारण्यासाठी प्रतिस्पर्धी गँगने 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीच्या (Ambedkar Jayanti) दिवशी हल्ला करायचे ठरवले होते. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पिस्तुल मिळवण्यात आली. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आरोपींना उत्तर प्रदेशातून बंदुकीच्या गोळ्या मिळाल्या. पवन हिरेणवार हत्याप्रकरणात जे लोक सहभागी होते किंवा ज्यांनी मदत केली, ते लोक मारेकऱ्यांच्या टार्गेटवर होते. विशेषत: प्रवेश गुप्ता आणि बांबुर्डे यांची हत्या करण्याची योजना आखण्यात आली होती.

प्रवेश गुप्ता हा दरवर्षी नागपूरच्या पांढरा बोडी परिसरात आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढतो. यामध्ये तो स्वत: सहभागी होतो. 14 एप्रिलला आंबेडकरी जयंतीमुळे सगळे पोलीस बंदोबस्तात असतात. त्यामुळे मिरवणुकीत प्रवेश गुप्ताची हत्या झाल्यास पोलिसांना त्याचा छडा लागणार नाही, असा मारेकऱ्यांचा अंदाज होता. या मिरवणुकीतच प्रवेश गुप्ताची हत्या करण्याचा प्लॅन होता. परंतु, प्रवेश गुप्ता 14 एप्रिलला या मिरवणुकीत आलाच नाही. मारेकऱ्यांनी प्रवेश गुप्ताचा शोध घेतला. मात्र, मिरवणूक निघून गेल्यानंतरही प्रवेश गुप्ता मारेकऱ्यांच्या हाती लागला नाही. त्यावेळी मारेकऱ्यांना हिरेणवार हत्याप्रकरणातील दुसरा आरोपी अभि भुसारी याचा चुलत भाऊ अविनाश भुसारी दिसला. प्रवेश गुप्ता हाती न लागल्यामुळे मारेकरी वैतागले होते. त्यामुळे 'तो नाही तर हा', असा विचार करुन बाबू आणि बंटी या मारेकऱ्यांनी अविनाश भुसारी यांच्यावर गोळ्या झाडल्या. बंटीने भुसारी यांच्यावर चार तर बंटीने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये अविनाश भुसारी यांचा मृत्यू झाला होता.

नागपूर पोलिसांनी आरोपींना कसे पकडले?
अविनाश भुसारी यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मारेकरी पळून गेले होते. ते पोलिसांपासून वाचण्यासाठी भंडारा, दुर्ग, डोंगरगाव, हावडा, विशाखापट्टणम, तिरुपती, बल्लारशाह असे फिरत राहिले. अखेर पोलिसांना तांत्रिक माहितीच्या आधारे बल्लारशहावरुन ट्रेनने गोंदियाला जात असल्याचे समजते. त्यानुसार नागपूर पोलिसांची पथके या ट्रेनमध्ये गेली. तेव्हा मारेकऱ्यांनी चालत्या ट्रेनमधून बाहेर उड्या टाकल्या. पोलिसांनीही बाहेर उड्या टाकून त्यांचा पाठलाग केला आणि दोन मारेकऱ्यांना पकडले. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. तर तिसरा मारेकरी शिबू याला पोलिसांच्या पथकांना ओळखता आले नाही. त्यामुळे शिबू गोंदियापर्यंत पोहोचला. मात्र, पोलिसांनी त्याला तिकडे ताब्यात घेतले, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल माखनीकर यांनी दिली.
अविनाश भुसारी यांची हत्या कशी झाली ?
नागपुरातील निंबस कॅफेच्या समोर सोशा रेस्टॉरंट आहे. 14 एप्रिलला अविनाश भुसारी आणि निंबस कॅफेचे मॅनेजर आदित्य हे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकत्र बसून आईस गोळा खात होते. यावेळी बाईकवरुन चार जण आले. त्यांनी पिस्तुलमधून अविनाश राजू भुसारी यांच्यावर फायर केला व ते तिथून पळून गेले. हिरणवार टोळीने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. भुसारींना व्होकार्ड हॉस्पिटल येथे भरती केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित करण्यात आले होते.

1
99 views