
म्हसवडमध्ये ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ माहिती रथाचे उत्स्फूर्त स्वागत
शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी BJS व शासनाचा उपक्रम
सातारा (म्हसवड ता. माण) : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या महत्वाकांक्षी योजनेची माहिती देणाऱ्या विशेष माहिती रथाचे स्वागत म्हसवड येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. भारतीय जैन संघटना (BJS) यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात फिरणाऱ्या या रथाचे पहिले स्वागत अहिंसा पतसंस्था कार्यालयाजवळ पार पडले.
यावेळी संस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी म्हणाले, “शासन व BJS यांच्यातील करारामुळे योजना गतीमान झाली असून ती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्याचे उद्दिष्ट आहे.”
यानंतर नगरपरिषद कार्यालयासमोर मुख्याधिकारी व प्रशासक डॉ. सचिन माने यांच्या हस्ते रथाचे स्वागत करण्यात आले. उपस्थितांना योजनेची माहिती पत्रके वाटण्यात आली.
नगरपरिषद दालनात आयोजित चर्चासत्रात माजी नगराध्यक्ष नितीनशेठ दोशी,माजी नगराध्यक्ष विजय धट, वसंत मासाळ, लाडकी बहीण योजनेचे आप्पासाहेब पुकळे, BJS शहराध्यक्ष डॉ. राजेंद्र मोडासे, माजी नगरसेवक आप्पासाहेब विरकर, निवृत्त अभियंता सुनिल पोरे आदींसह अनेक मान्यवर व शेतकरी सहभागी झाले.
यावेळी BJS समन्वयक अक्षय कांबळे यांनी, “नगरपालिका क्षेत्र असल्याने सदर योजना थेट राबवता येत नाही, मात्र ‘नाम फाउंडेशन’ व ‘टाटा मोटर्स’च्या सहकार्याने तिथे अंमलबजावणी शक्य आहे,” असे सांगितले. यावर उपस्थित मान्यवरांनी संपूर्ण सहकार्याची हमी दिली. मुख्याधिकारी डॉ. माने यांनी या संदर्भात ठराव करण्याचे आश्वासन दिले.
शेवटी, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून योजना युद्धपातळीवर राबवण्यासाठी शिष्टमंडळाने भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला.