logo

धुळे महाजन हायस्कूलमध्ये कै. बापूसाहेब अँड. संभाजीराव पगारे यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ व माळी समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण शोकसभा

धुळे महाजन हायस्कूलमध्ये कै. बापूसाहेब अँड. संभाजीराव पगारे यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ व माळी समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण शोकसभा

धुळे प्रतिनिधी
धुळे येथील महाजन हायस्कूल येथे कै. बापूसाहेब अँड.संभाजीराव पगारे यांच्या निधनानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ व समस्त माळी समाज धुळे जिल्हा यांच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेचे अध्यक्षस्थानी धुळे नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष हनुमंत आप्पा वाडीले हे होते. याप्रसंगी स्वर्गीय बापूसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .शोकसभेत काही समाज बांधवांनी आपल्या बापूसाहेबांबद्दलच्या आठवणी जाग्या केल्या धीरज पाटील...

कै. बापूसाहेब हे निष्ठावंत कार्यकर्ता होते राष्ट्रीय स्वयं संघ व अखिल भारतीय माळी महासंघ अशा दोन संघटनांचे कार्य करतांना बापूसाहेबांनी कधीही या दोन भिन्न गोष्टींची सरमिसळ होऊ दिली नाही. बापूसाहेब हे एक हाडाचा कार्यकर्ता होते व सदैव पक्षाशी एकनिष्ठ राहिले. माळी समाजातील सर्व पोट जाती विसरून ते फक्त माळी समाज कसा राहील यासाठी नेहमी प्रयत्न करायचे. त्यांच्या जाण्याने समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. एक दूरदृष्टी असलेला नेता हरपला आहे.
अण्णा माळी सर..

सर्व पोट जातीत वैचारिक समानता दिसून येत नाही बापूसाहेब म्हणायचे की सर्व पोट जातीमध्ये वैचारिक समानता असावी .बापूसाहेबांवर संघाचा फार मोठा प्रभाव होता. त्यांची साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी एक वेगळीच प्रेरणा देत असे. बापूसाहेबांमध्ये विशेष असे संघटन कौशल्य होते. बापूसाहेब नेहमी दुसऱ्यांना मदत करीत असत. त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व नेहमी प्रभावित करत असे. महात्मा फुले विचार मंच या माध्यमातून बापूसाहेबांचे कार्य आम्ही पुढे चालू ठेवू .
एम एच पाटील..

बापूसाहेब हे एक प्रतिभाशाली विचारवंत होते त्यांची दूरदूरपर्यंत ख्याती होती. समाजासाठी तळमळीने झटण्याची त्याचा एक वेगळीच ख्याती होती. अनेक गोष्टी ज्ञात असलेला व अनेकांच्या मदतीला धावून जाणारा असा माळी समाजातला नेता गेल्याने समाजावर फार मोठी हानी झाली आहे.
मिलिंद सोनवणे...

महात्मा फुले यांची जयंती असो किंवा पुण्यतिथी, बापूसाहेब नेहमी महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी यायचे. नुकताच काही दिवसांपूर्वी हनुमंत आप्पा वाडीले यांच्या वाढदिवशी व श्री व्ही. बी. पाटील सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात बापूसाहेबांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सर्वांना प्रभावित करून टाकले होते. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा प्रत्येक विषयातील गाढा अभ्यास दिसून येत होता. त्यावेळी त्यांच्याकडे पाहून मनात किंचितही शंका आली नव्हती की आपल्याला बापूसाहेबांच्या शोक सभेला यावे लागेल. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या म्हणण्यानुसार पुस्तके वाचल्याने मनुष्य काहीतरी चांगले कार्य करण्यास प्रवृत्त होतो किंवा कार्य असे करा की लोक तुमच्यावर पुस्तक लिहीतील. बापू साहेबांकडे पाहून ही गोष्ट खरी वाटते. एक चांगले समाजकारणी ,राजकारणी, संस्थाचालक ,संघटक लेखक, कवी आपल्या तून निघून गेल्याने मन हेलावून गेले आहे. बापू साहेबांना महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
बी एच जाधव सर....

कै. चंद्रकांत पांढरे सरांबरोबर अखिल भारतीय माळी महासंघाचे कार्य बापूसाहेबांनी खूप जोमाने चालू ठेवले होते. समाजातील सर्व पोटजाती विसरून आपण एक माळी म्हणून एकत्र राहू या, असे ते नेहमी म्हणायचे .ते एक चांगले लेखक, कवी,वक्ता, संस्थाचालक, उद्योजक होते,ते समाजासाठी आदर्श असे दीपस्तंभ होते. हनुमंत आप्पा वाडीले यांच्या वाढदिवशी त्यांनी ज्या पद्धतीने अध्यक्षीय भाषण केले होते, ते ऐकून आम्ही भारावून गेलो होतो. परिस्थितीनुसार योग्य ते बोलणे त्यांना चांगल्या प्रकारे ज्ञात होते. एक नम्रशील व्यक्तीमत्व हरपल्याने खूप दुःख झाले आहे .

एसटी चौधरी सर ..

शिक्षक परिषदेत काम करत असताना श्रीमती पगारे मँडमांशी परिचय झाला. त्यांच्यामुळे बापूसाहेबांशी परिचय झाला. बापूसाहेबांचे बोलणे प्रभावित करत असे. समाजातील आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आश्रम शाळा सुरू केल्या. आश्रम शाळेच्या सुसज्ज अशा इमारती उभ्या केल्या .एक चांगला शिक्षित असा कर्मचारी व्रुंद भरून आज त्यांच्या आश्रम शाळा नावारुपास आलेल्या आहेत. चंद्रकांत पांढरे सरांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी महासंघ वाढविण्यासाठी काम केले. अतिशय मनाने सोज्वळ कुठलाही, गर्व नसलेले बापूसाहेब सर्वांच्या मनावर राज्य करत होते. व्यक्ती किती जगला याला महत्व नाही तर तो कसा जगला याला फार महत्त्व असते. आणि बापूसाहेबांच्या कडे बघून ते खरे वाटते. एक दूरदृष्टी असलेला समाजातील नेता हरपल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
आर के माळी....

अखिल भारतीय माळी महासंघाच्या माध्यमातून कै.बापू साहेबांशी माझा परिचय झाला. हळूहळू त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मला त्यांच्यातील अनेक वेगवेगळे पैलू दिसू लागले. त्यांच्यात असलेला दानशूरपणा खूप काही सांगून जायचा. त्यांनी अनेक पीडित, रुग्ण यांना आर्थिक मदत करून त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारणात देखील ते अतिशय नम्रपणे व्यवहार करत असत. त्यामुळे अनेक दिग्गज देखील त्यांच्यासमोर नम्र होत असत. डोक्यावर बर्फ व तोंडात साखर याप्रमाणे ते वागत होते. त्यांच्या अचानक जाण्याने अखिल भारतीय माळी महासंघासाठी खूप मोठे नुकसान झाले आहे. महासंघासाठी त्यांचे मार्गदर्शन मिळणे खूप महत्त्वाचे होते परंतु वेळेला कदाचित ते मान्य नसावे.

संदीप माळी सर ...

संस्था अध्यक्ष असून देखील बापूसाहेब सर्व कर्मचाऱ्यांशी प्रेमाने व्यवहार करत असत. चतुर्थश्रेणी कर्मचारी असला, तरी त्याच्याशी अगदी प्रेमाने बोलत असत. शालेय विकासासाठी ते कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाला पाठवत असत. कर्मचाऱ्यांमध्ये एकोपा राहिला तर शाळेला काही धक्का लागणार नाही असे ते नेहमी सांगत असत. त्यांची स्मरणशक्ती देखील खूप प्रचंड होती. बापू साहेबांना अनेक क्षेत्रातील ज्ञान होते. कर्मचारी खरे बोलतो की खोटे बोलतो हे ते पटकन ओळखून घेत होते. संकटकाळ कसा हाताळावा याचे त्यांना उत्तम ज्ञान होते. अनेक संघटनांवर ते पदाधिकारी होते आणि प्रत्येक संघटनेला योग्य वेळी योग्य न्याय देत होते. एक बहु आयामी असे व्यक्तिमत्व हरपल्याने सर्व कर्मचाऱ्यांना पोरके झाल्यासारखे वाटत आहे. लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं बापूसाहेब नेहमी म्हणायचे परंतु कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेमके उलट झाले.आता फक्त बापूसाहेबांच्या आठवणी स्मरणात ठेवून पुढील वाटचाल करावी लागेल. बापूसाहेबांनी सांगितलेल्या गोष्टीनुसार सर्व कर्मचारी यापुढे वाटचाल करतील व संस्थेचे हे लावलेले रोपटे मोठ्या वटवृक्षात रूपांतरित करण्यासाठी मेहनत करतील.

विलासराव पाटील सर...

अखिल भारतीय माळी महासंघाचे काम करत असताना बापूसाहेब नेहमी अक्का साहेबांना सोबत घेऊन फिरत असत. बापूसाहेबांनी माळी महासंघ उत्तम प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवून महात्मा फुले यांचे विचार समाजात उत्तम प्रकारे बिंबविण्यात त्यांच्यात एक कला होती. ते कोणालाही कधी वाईट बोलत नसत. ते नेहमी दुसऱ्याबद्दल आदरभाव राखत होते त्यांच्या बोलण्यात नम्रपणा होता. यावर्षी मे महिन्यात सर्व महासंघाचे विश्वस्त काश्मीरला जाणार होते व तेथे महासंघाचे पदाधिकारी नेमणार होते. त्यांचा संदेश होता की कुठेही काम करा पण एकत्र रहा. ते प्रबळ इच्छाशक्ती असलेले व्यक्तिमत्व होते व नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांची वाटचाल असे. ते वकील, शेतकरी, लेखक, कवी, व्यावसायिक होते. असे बहु आयामी व्यक्तिमत्व असलेले बापूसाहेब महासंघातील सर्वांसाठी आवश्यक होते. त्यांचे मार्गदर्शन सगळ्यांना प्रेरणादायी ठरत असे. त्यांच्या अकाली निधनाने महासंघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. महासंघाच्या बैठकीत नेहमी त्यांची उणीव भासत राहील .यापुढे महासंघाचे काम आपण संपूर्ण भारतभर पसरवूया हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. यावेळी बापूसाहेबांबद्दल सांगताना अनेकांचे मन दाटून आले होते. शोकसभेला सर्व पोट जातीतील अनेक मान्यवर, समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन काशिनाथ माळी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री दिनेश खैरनार सर यांनी केले.

16
2107 views