logo

धाबा व सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे मद्यसेवन करणाऱ्यांवर कारवाई

नांदेड दि. 4 मे :- महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68, 84 व 85 अन्वये जिल्ह्यातील 35 धाब्यावरील 35 धाबाचालक, मालक, धाब्यावर अवैधपणे 116 मद्यपींवर व अनधिकृतरित्या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या 21 मद्यपींवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नुकतीच कारवाई करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, राज्य उत्पादन शुल्कचे नांदेड विभागीय उपआयुक्त बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड रा.उ.शु. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यकारी, भरारी पथकाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी 23 एप्रिल 2025 ते 3 मे 2025 या काळात केलेल्या कारवाईत 35 धाब्यामध्ये विनापरवाना तेथे येणाऱ्या ग्राहकांना मद्यसेवनास अवैध परवानगी देत असलेल्या धाब्यावर दारुबंदी गुन्हेकामी छापा घातला असता एकूण 116 ग्राहकांना मद्य पिण्याचे परवानगी दिल्याचे आढळून आल्याने या ठिकाणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 व 84 अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली.

अनधिकृतरित्या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या इसमांविरुद्ध 3 मे 2025 रोजी निरीक्षक, विभागीय भरारी पथक, निरीक्षक नांदेड शहर व निरीक्षक भरारी पथक यांनी शेतकरीपुतळा परिसर, अशोकनगर, वर्कशॉप कॉर्नर परिसर, लातूरफाटा परिसर, जुनामोंढा परिसर व शिवाजीनगर परिसर येथे विशेष मोहिम घेण्यात आली होती. यात एकुण 21 इसमावर 3 मे 2025 रोजी महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे 85 अंतर्गत कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व निरीक्षक, दु.नि., स.दु.नि. जवान, जवान-नि-वाहन चालक यांनी कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली.

अधीक्षक अतुल कानडे यांचे आवाहन

महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (क), (ख) अन्वये अवैध हॉटेल,धाबा,क्लब इत्यादी चालक मालक यांनी अवैध हॉटेल, धाबा, क्लब इत्यादीमध्ये शासनमान्य अनुज्ञप्ती नसताना ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास त्यांना 3 ते 5 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा 25 ते 50 हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही होऊ शकते.

महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 84 अन्वये एखादी ग्राहक, व्यक्तीने अवैध हॉटेल, धाबा, क्लब इत्यादी ठिकाणी मद्यप्राशन केल्यास त्यांना 5 हजार रुपयांपर्यंत दंड होवू शकतो. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 85 अन्वये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन केल्यास त्यांना 6 महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा आणि 10 हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकते. नागरिकांना कुठल्याही अवैध ढाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारु पितांना आढळून आल्यास ढाबा मालकासह मद्यसेवन करणाऱ्या इसमाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

0
0 views