
विजेचा तार तुटल्याने सायकल स्वाराचा मृत्यू.
11kvतार तुटल्याने अपघात
Aima Media news chandrapur
चंद्रपूर :- आकाशवाणी पासून जगन्नाथ बाबा नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर काल सोमवार दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 6 ते 6.30 वाजताच्या सुमारास रस्त्यावर तुटून पडलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. प्रभाकर गणपत क्षीरसागर असे मृतकाचे नाव असुन ते दाताळा येथील रहिवासी होते.
सविस्तर असे की जगन्नाथ बाबा नगर येथील ए 65 क्रमांकाच्या खांबावरून 11 केव्ही विजेची तार जाते. सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास ही तार तुटून रस्त्यावर पडली. काही स्थानिक नागरिकांनी विज वितरण कंपनीला याची तातडीने ऑनलाईन तक्रार केली. मात्र सायंकाळी 6 – 6.30 वाजेपर्यंत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विज पुरवठा बंद केला नाही व पडलेली तार सुद्धा उचलली नाही. यादरम्यान जनता महाविद्यालयात सुरक्षा रक्षक असलेले दाताळा येथील रहिवासी प्रभाकर गणपत क्षीरसागर सायकलने सायंकाळच्या ड्युटीवर चालले होते. रस्त्याने जात असताना सायकलच्या चाकात विजेचा तार अडकून ते पडले व तारेला स्पर्श झाला.11 केव्हीच्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. देशमुख यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा तसेच विज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पाटील यांना घटनास्थळी पाचारण केले.
यावेळी मृतकांचे कुटुंबीय तसेच दाताळा व जगन्नाथ नगर मधील रहिवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नुकसान भरपाई चे लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका उपस्थित नागरिक व मृतकाच्या कुटुंबीयांनी घेतली. अखेर विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.
दरम्यान वीज वितरण कंपनीला ऑनलाईन तक्रार करूनही एक ते दीड तासापर्यंत 11 केव्हीची तुटून वर्दुळीच्या रस्त्यावर पडलेली विजेची तार उचलण्यास व वीज पुरवठा बंद करण्यास विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी – कर्मचाऱ्यांनी अक्षम्य विलंब केला. वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे एका निष्पाप नागरिकाच्या नाहक बळी गेला. कमावता व्यक्ती गेल्याने क्षीरसागर कुटुंब उघड्यावर पडले. यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना 50 लक्ष रुपयाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.