
यंदा 11 वीचे प्रवेश होणार केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने
नांदेड, दि. 5- मागील काही वर्षापासून राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 11 वीचे प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने चालू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय काढून राज्यातील इतर सर्व जिल्हयांतील शहरी व ग्रामीण भागातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून चालू करण्याचे निश्चीत केले आहे. त्यानुसार राज्यस्तरावरून ते जिल्हा स्तरापर्यंत याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हयातील उच्च माध्यमिक शाळांकडून विहित नमुन्यात माहिती घेण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक, विद्यार्थी व शाळांना माहिती होणे गरजेचे आहे.
उच्च माध्यमिक विद्यालयांनी करावयाची कार्यवाही- केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पध्दतीनुसार सर्वप्रथम सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांना त्यांचे संस्थेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन शासनाने दिलेल्या वेबसाईडवर करावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांचे उच्च माध्यमिक विद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. यासाठी शासनाकडून दिलेल्या वेबसाईडवर सर्व शाळांनी वेळापत्रकानुसार नोंदणी करावी. नोंदणी करण्यापूर्वी सर्व कॉलेजने काही अभिलेख्यांची पूर्वतयारी शाळास्तरावर करुन ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये इंटरनेटची सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना सुलभतेने प्रवेश घेता यावेत तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान यासाठी पुर्णवेळ यंत्रणा कार्यान्वित करावी. माहितीपुस्तिका प्रत्येक विद्यार्थ्यांना पाहता येईल यासाठी शाळास्तरावरच नियोजन करावे. यामध्ये माध्यमिक शाळांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. शक्यतोवर माध्यमिक शाळांमधूनच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश भरण्यासाठी सोय करुन देण्यात यावी. उच्च माध्यमिक विद्यालयांनी शासन मान्यता आदेश, मान्यता प्राप्त विषयांचे मंडळ मान्यता आदेश, शाखा अतिरिक्त तुकडी आदेश, अल्पसंख्यांक प्रमाणपत्र, बँक डिटेल्स इत्यादि बाबींची पूर्वीच तयारी करुन ठेवावी. शैक्षणिक शुल्काबाबतचे आवश्यक कागदपत्रे मान्य असणे आवश्यक आहे. प्राचार्यांनी त्यांचे कॉलेजची माहिती वेबपोर्टलवर भरतांना योग्य ती दक्षता घ्यावी. कोणतीही माहिती अंदाजित अथवा चूकीची भरूनये. यामुळे भविष्यात उदभवणा-या परिणामास संबंधित प्राचार्य, व्यवस्थापन जबाबदार राहिल. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन झालेले प्रवेश हे इयत्ता 12 वी परीक्षेसाठी ग्राहय धरले जाणार नाहीत. म्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेशिवाय इतर कोणत्याही मार्गाने दिलेले प्रवेश हे ग्राहय धरले जाणार नाहीत.
विद्यार्थ्यांनी करावयाची कार्यवाही- विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वीचा निकाल लागण्या अगोदर व निकाल लागल्यानंतर अशा दोन वेळा वेगवेगळी नोंदणी करावी लागते. याची नोंद घ्यावी. प्रत्येक विद्यार्थ्यांना एकच ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे. त्यामुळे फॉर्म भरण्यापूर्वी काही बाबी स्वत:जवळ तयार असणे गरजेचे आहे. यामध्ये इयत्ता 10 वीचे गुणपत्रक, टीसी, आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र, फोटो, अद्यावत आधारकार्ड, फोटो इत्यादि स्वत:जवळ तयार ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थी स्वतच्या मोबाईलमधून देखिल ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकतो किंवा त्याच्या इयत्ता 10 वीच्या शाळेतून देखिल मुख्याध्यापकांचे मदतीने प्रवेश भरू शकतो. ऑनलाईन अर्ज दोन भागात भरावा लागणार आहे. त्यासाठी शासनाकडून वेबसाईड कार्यान्वित झाल्यावर इयत्ता 10 वीचा निकाल लागण्यापूर्वीच भाग-1 भरावयाचा आहे. यासाठी वेबसाईडवर वेळोवेळी वेळापत्रक दिले जाणार आहे. त्याची पाहणी विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे. प्रवेशाच्या एकुण 04 फे-या होतील. यामध्ये पहिली शुन्य फेरी ही केवळ भाग-1 भरण्यासाठी व पूढील फे-यांच्या पूर्वतयारीसाठी असेल. तसेच याफेरीमध्ये नियमित फेरी भाग-1 प्रवेशकरीता पसंतीक्रम देण्यासाठी अर्ज भाग-2 भरता येईल व कोटा प्रवेशासाठी अप्लाय करता येईल. याठिकाणी एक बाब लक्षात घ्यावी की, राखीव कोटयातील प्रवेश तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश यासाठी देखिल ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. कोटयांतर्गत प्रवेश घेण्यास पात्र नसलेले अथवा कोटयांतर्गत प्रवेश घेऊ इच्छित नसलेल्या विद्यार्थ्यांना CAP केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पुढील फे-यांसाठी भाग घेता येणार आहे. हा प्रवेश राखीव प्रवर्गानुसार होईल. म्हणजेच, अनु.जाती., अ.जमाती, विजा-अ, ब, क, ड, विमाप्र, इमाव, एसईबीसी, ईडब्लयूएस, समांतर आरक्षण व खुला या प्रवर्गातून त्यांना लागू असलेल्या टक्केवारीनुसार प्रत्येक कॉलेजमध्ये होईल. शालेय शुल्क हे शासन नियमाप्रमाणे आकारले जाणार असून विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित उच्च माध्यमिक विद्यालयांचे शुल्क संबंधित व्यवस्थापनामार्फत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क अधिनियम 2011 नुसार निश्चीत केले जाते. त्यामुळे अशा कॉलेजमध्ये शुल्क वेगवेगळ असू शकते.
तरी याद्वारे जिल्हयातील सर्व पालक, विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे व्यवस्थापन यांना आवाहन करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 11 वीचे प्रवेश हे शहरी व ग्रामीण दोन्ही भागांसाठी केंद्रीय ऑनलाईन पध्दतीनेच होणार आहेत. त्यामुळे शासनाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेबसाईडवर नेहमी येणा-या वेळापत्रकांना तसेच मार्गदर्शक सुचनांना पाहावे. तसेच काही अडचणी येत असल्यास तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालय, संबंधित माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे कार्यालयात मदत कक्ष लवकरच स्थापण होणार असून यासाठी आपणास वेगळ्याने यथावकाश माहिती दिली जाणार आहे. अशी माहीती शिक्षण विभाग माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी दिली आहे.