
विघ्नहर्ता सोसायटीमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता व ड्रेनेज कामाचे लोकार्पण आणि नागरी सत्कार सोहळा संपन्न ,
ठाणे - यशोधन नगर येथील विघ्नहर्ता सोसायटीमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता व ड्रेनेज कामाचे लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते आणि कार्यसम्राट नगरसेवक मा. दिलीपजी बारटक्के यांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण झाले. या कामामुळे विघ्नहर्ता सोसायटीतील १४८ सभासद व सात इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे विकासकाम यशस्वी झाले.
या सोहळ्यात विघ्नहर्ता सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मुंबई विभाग संपर्कप्रमुख व ठाणे जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद वाघमोडे यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. त्यांची नुकतीच "महाराष्ट्र राज्य महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच, मुंबई" या संस्थेच्या कोकण विभागीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शिवसेनेचे गटनेते मा. दिलीपजी बारटक्के यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात सोसायटीतील ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांचाही सन्मान करण्यात आला. विघ्नहर्ता सोसायटी महासंघाच्या वतीने हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाला शिवसेनेचे गणेशजी तांबे, महासंघाचे अध्यक्ष शशिकांत महाडिक, पदाधिकारी श्री प्रदीप पालांडे, माजी वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक श्री अविनाश सोंडकर, तसेच विघ्नहर्ता सोसायटीचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.