logo

नवरंग पक्षाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले

प्रिय मानवा ,
काय मानवा ओळखले का मला?
मी आहे नवरंग ,
माझे शास्त्रीय नाव Pitta brachyura.
मराठीत मला बहिरा पाखरू, बहिरा, बंदी, खाटिक, गोळफा, पाऊसपेव, पाचापिल अशा
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

काही दिवसांपूर्वी आपल्यातील कोणीतरी आपले नेमबाजीतील प्रावीण्य दाखवण्यासाठी मला दगड मारला.

सुदैवाने कु. हिमभास धुरु, रा .००२ सर्वोदय आशिष, बि.नं.०३, ठाकुर्ली पूर्व. या पक्षीप्रेमी विद्यार्थ्याने मला जखमी अवस्थेत सोमवार ता. २६ मे २०२५ रोजी संध्याकाळी ५ : ०० वाजता पाहिले.

त्यांनी त्वरित निसर्ग विज्ञान संस्था, डोंबिवली यांच्याशी संपर्क साधून मला वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्या ताब्यात दिले.

आम्ही नवरंग पक्षी भारतातील सर्व वनांत आणि झुडपी वनांत आढळतो. त्याचप्रमाणे आम्हाला झुडपी वनांत राहायला खूप आवडते. तसेच बहुतेक वेळ आम्ही
जमिनीवर देखील असतो .

आम्ही नर आणि मादी दिसायला सारखेच असतो. आमच्या अंगावर निळा, हिरवा, काळा, पांढरा, तांबडा हे भडक रंग प्रामुख्याने दिसतात. आकारमानाने आम्ही मैनेएवढे आणि भुंड्या शेपटीचे आहोत. आमच्या पोटाखालचा व शेपटीखालचा रंग किरमिजी असतो. आम्ही उडताना पंखांच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके दिसतात .
आमचे खाद्य म्हणजे विविध प्रकारचे कीटक.

आमचा प्रजनन काळ मे ते ऑगस्ट असतो.
झाडांची मुळे, काड्या यापासून आम्ही घरटी बनवतो. घरट्यात मादी ४ ते ६ अंडी देते .
आमचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सकाळ संध्याकाळ " व्हीट - ट्यू " असा आवाज काढतो. कदाचित ढगाळ वातावरणामुळे दिवसभर आम्ही असा आवाज करतो.

निसर्ग विज्ञान संस्थेने माझ्यावर प्रथमोपचार करून मला बरे केले. मी मरता मरता वाचलो. निसर्ग विज्ञान संस्थेचे कार्यकर्ते श्री. विनायक गंधेरे यांनी मंगळवार ता. २७ मे २०२५ रोजी मला सकाळी १०:३० वाजता माझ्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. माझा अशा प्रकारे प्राण वाचवल्याबद्दल मी कु. हिमभास धुरू व निसर्ग विज्ञान संस्थेचे आणि ( WCCB ) शतशः आभार मानतो.

https://youtu.be/gpiYjfGx8dQ?si=wdOsoDy7VABa39KN

86
2884 views