logo

खापर येथील शासकीय विश्रामगृहाची दयनीय अवस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बनले मद्यपी व धूम्रपान करणाऱ्यांचा अड्डा

खापर येथील शासकीय विश्रामगृहाची दयनीय अवस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बनले मद्यपी व धूम्रपान करणाऱ्यांचा अड्डा
अक्कलकुवा प्रतिनिधी: अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील शासकीय विश्रामगृहाची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने या विश्रामगृहाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने, इमारतीमधील अनेक वस्तूंची चोरी झाली असून मोठ्या प्रमाणावर तोडफोडही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शासकीय मालमत्तेची अशी तोडफोड आणि चोरी होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल न केल्याने परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
अवैध धंद्यांचा अड्डा
सध्या या विश्रामगृहाचा परिसर दारू, सिगारेट आणि गांजा पिणाऱ्यांचा अड्डा बनला आहे. परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. नेत्रंग-शेवाळी महामार्गालगतच असलेले हे शासकीय विश्रामगृह एकेकाळी प्रवाशांसाठी विश्रांतीचे महत्त्वाचे ठिकाण होते. महाराष्ट्र हद्दीतील हे शेवटचे एकमेव विश्रामगृह असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही ते आधार ठरू शकले असते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतीच्या दुरुस्ती किंवा नवीन बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतेही नियोजन झालेले नाही. कुंपण तोडून अतिक्रमणही सुरू झाले आहे.
स्थानिकांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सततच्या दुर्लक्षामुळे ही इमारत आता अवैध धंदे करणाऱ्यांचा अड्डा बनली आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.

36
12167 views