
धुतुम येथील शेतकऱ्याचा सिडको कार्यालयाच्या आवारातच दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न
धुतुम येथील शेतकऱ्याचा सिडको कार्यालयाच्या आवारातच दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न
सिडको अधिकाऱ्यांना जीव गेल्यावर जाग येणार का ? नातेवाईकांचा आरोप
बेलापूर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु; प्रकृती स्थिर
उरण : राज भंडारी
उरण तालुक्यातील धुतुम येथील शेतकऱ्यांच्या जागेचा मोबदला न देता त्याच्या ताबेकबज्यातील जमीन बळकावण्यासाठी सिडको अधिकाऱ्यांना हाताशी धरून काहीजण नाहक त्रास दिल्याचा आरोप करीत धुतुम येथील शेतकरी दत्तू भिवा ठाकूर या ८३ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने सिडको कार्यालयाच्या आवारातच मंगळवारी दुपारच्या सुमारास विशप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. सिडको कार्यालयात मंगळवारी बैठक लावण्यात आली होती, पुन्हा जैसे थे परिस्थिती झाल्यामुळे सिडको अधिकाऱ्यांच्या एकतर्फी वागण्याचा त्रास त्यांना सहन झाला नाही, म्हणून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे दत्तू ठाकूर यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. तसेच सिडकोचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी भरत ठाकूर हे आमच्याच जागेत पार्किंग व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी ५० हजार रुपये हप्त्याची मागणी करीत असल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केला.
शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांना १२ जून रोजी दिलेल्या पत्रामध्ये मला आत्महत्या करावी लागेल, असा इशारा दिला असतानाही पोलीस प्रशासनाकडून दखल घेतली नसल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. सदर प्रकारात दत्तू ठाकूर यांची जमीन सिडकोने संपादित केली होती. यामध्ये अजून मोबदला देण्यात आला नव्हता. तसेच सिडकोकडून १२.५% टक्के विकसित भूखंड मिळाला नाही. यासाठी शासनाकडून त्यांना उदरनिर्वाहसाठी ४ एकर ९ गुंठे भूखंड देण्यात आला. यावर दत्तू ठाकूर यांनी पार्किंग व्यवसाय सुरु केला, मात्र सिडको अधिकारी भरत ठाकूर हे वारंवार दत्तू ठाकूर यांच्याकडे महिन्याकाठी ५० हजार रुपयांची मागणी करीत असल्याचे दत्तू ठाकूर यांच्या मुलीने प्रसिद्धीमाध्यमांजवळ बोलताना सांगितले.
ज्या ठिकाणी शेतकऱ्याला उदरनिर्वाहसाठी भूखंड देण्यात आला होता, तो भूखंड देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांनी हिसकावून घेत एलएनटी कंपनीला दिला असल्याचे सांगून या भूखंडावरून त्यांना हुसकावून लावले. मात्र प्रत्यक्षात याठिकाणी पागोटे येथील एकाला पुन्हा पार्किंगचा व्यवसाय करण्यासाठी सदर भूखंड देण्यात आला. त्यामुळे सदरबाबत शेतकऱ्याने जाब विचारला असता मंगळवारी सिडको कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली. तत्पूर्वी आपल्यावर अन्याय होत असून आपल्याला न्याय न मिळाल्यास आपण आत्महत्या करू शकत असल्याचा इशारा शेतकरी दत्तू ठाकूर यांनी उरण पोलिसांना दिलेल्या पत्रामध्ये दिला आहॆ. मात्र काही धनदांडग्यांच्या आणि सिडको अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे आमच्यावर पोलीस प्रशासन देखील अन्याय करीत असल्याचा आरोप ठाकूर यांच्या मुलीने केला आहॆ.
याबाबत मंगळवारी झालेल्या सिडको कार्यालयाच्या बैठकीत दत्तू ठाकूर यांना पुन्हा तोच अनुभव येत, आम्ही तुम्हाला याठिकाणी राहू देणार नाही, असा सज्जड दम सिडको अधिकारी भरत ठाकूर यांनी दिला असल्यामुळे निराश झालेले दत्तू ठाकूर यांनी कीटकनाशक असे विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी सिडको परिसरात बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी त्यांना बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केली. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहॆ. एखाद्या शेतकऱ्यावर स्वतःच्या जमिनीसाठी जीव देण्याची वेळ शासन आणत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायाची प्रतीक्षा तरी कोणाकडे करावी ? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहॆ.