logo

87 हजार शेतकऱ्यांना धानाच्या बोनस वाटपाची प्रक्रिया सुरू

गडचिरोली : जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपयाच्या मर्यादेत बोनस वाटपासाठीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. जिल्ह्यात जवळपास 87 हजार शेतकरी या बोनससाठी पात्र ठरले आहेत. धान खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ अशा दोन एजन्सी असल्याने त्यांच्यामार्फत ही प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू आहे.

दरम्यान धान विक्रीसाठी नोंदणी करताना काही शेतकऱ्यांनी दोन ठिकाणी नोंदणी केली. त्यामुळे एकाच शेतकऱ्याला बोनसचा डबल लाभ दिला जाऊ नये यासाठी नावांची यादी दुरूस्त केली जात आहे. या कामामुळे मार्केटिंग फेडरेशनकडे बोनसचे पैसे आधी येऊनही त्यांना बोनस वाटपाची सुरूवात करण्यास विलंब लागला.

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय आणि अहेरी उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाला नाशिकच्या मुख्य कार्यालयामार्फत बोनसची रक्कम प्राप्त झाली. त्यांनीही बोनस वाटपासाठी प्रक्रिया सुरू केली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम बँकेमार्फत वळती केली जात आहे.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असताना बोनसची रक्कम मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

4
2787 views