logo

हिंगोली जिल्ह्यातील १४ गावे 'रूफटॉप सोलर मॉडेल व्हिलेज' म्हणून घोषित होणार – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती

हिंगोली जिल्ह्यातील १४ गावे 'रूफटॉप सोलर मॉडेल व्हिलेज' म्हणून घोषित होणार – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती

हिंगोली, दि. २६ जून (वंदे भारत न्यूज प्रतिनिधी)
हिंगोली जिल्ह्यातील ५,००० हून अधिक लोकसंख्या असलेली १४ गावे लवकरच 'रूफटॉप सोलर मॉडेल व्हिलेज' म्हणून घोषित होणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ही माहिती दिली.

ही अधिकृत माहिती जिल्हा जन माहिती अधिकारी, हिंगोली यांच्या मार्फत प्राप्त झालेली असून, जनहितार्थ प्रसिद्ध केली जात आहे.

या योजनेअंतर्गत, संबंधित गावे शंभर टक्के सौरऊर्जेवर आधारित बनवली जाणार असून केंद्र शासनाकडून प्रत्येकी १ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या निधीतून घरगुती सौर दिवे, पथदिवे, सौर पंप, तसेच शासकीय इमारतींवरील सोलर पॅनल्स लावण्यात येणार आहेत.

हरित ऊर्जा वापरात जिल्ह्याची मोठी कामगिरी अपेक्षित
जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले की, स्वयंपूर्ण आणि हरित ऊर्जेवर चालणारी गावे तयार करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. महावितरण व महाऊर्जा विभाग ग्रामपंचायतींच्या सहकार्याने गावोगावी जनजागृती मोहिमा राबवतील.

बैठकीस उपस्थित अधिकारी:
महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. एम. चव्हाण, महाऊर्जेचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत गायकवाड, शिखर बँकेचे पंकज बोरकर, उपविभागीय अभियंता रणजीत देशमुख, तसेच डिग्रसचे सरपंच व सोलर व्हेंडर्स उपस्थित होते.

तरुणांसाठी कमाईची संधी:
एखाद्या घरात सौर ऊर्जा बसवण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीला १ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. यामुळे गावपातळीवर युवकांना कमाईची संधी व सौरऊर्जेचा प्रचार करण्याची संधी मिळेल.

शासकीय इमारतींवर सौरसंच:
सर्व शासकीय इमारतींवर सौर पॅनेल्स लावण्यासाठी सर्वेक्षण करून महाऊर्जा विभागाने प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

महावितरणची माहिती सादरीकरणातून:
महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांनी जिल्ह्यातील वीज वितरण, आरडीएसएस योजना, वीज वाहिन्यांचे विलगीकरण इत्यादी बाबत सादरीकरण केले.


ही माहिती जिल्हा जन माहिती कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत अधिकृत स्वरूपात प्राप्त झाली असून, वाचकांपर्यंत जनहितार्थ पोहोचवण्यात येत आहे.

70
1532 views