logo

10 जुलै अवतार मेहरबाबा यांचा मौन स्मरणदिनानिमित्त आदरांजली

वार्ताहर
नागपूर ग्रामीण:काटोल
अवतार मेहरबाबांनी 10 जुलै 1925 रोजी मौन धारण केले आणि 31 जानेवारी 1969 ला शरीर सोडेपर्यंत 44 वर्ष आपले मौन त्यांनी कायम ठेवले. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणानिमित्त जगभरातले बाबा प्रेमी 9 जुलै च्या मध्यरात्रीपासून ते 10 जुलै च्या मध्यरात्रीपर्यंत मौन राहून आपल्या प्रियतमाला आदरांजली वाहतात. यावर्षी त्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्त मेहेर बाबा, त्यांनी धारण केलेले मौन, त्यांच्या मौनाचे उद्दीष्ट आणि परिणाम याचा संक्षिप्त आढावा घेऊ यात.

संपूर्ण विश्वाचा कारभार चालवणारे पाच सद्गुरु नियोजित वेळी परमेश्वरी तत्वाला मनुष्य रूपात अवतरीत होण्याचे आवाहन करतात. त्यांच्या आवाहनाला आपल्या अनंत प्रेमा खातर परमेश्वर प्रतिसाद देतो आणि संपूर्ण सृष्टीला स्वतःकडे आकर्षित करणारे मनुष्य रूप धारण करतो.
अशा युगपुरुषाला वेगवेगळ्या धर्मातले ज्ञानी लोक वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी विविध नावाने संबोधतात; कोणी ईश्वरी पुरुष म्हणतात, कोणी परमेश्वरी अवतार म्हणतात, कोणी प्रेषित म्हणतात तर कोणी ईश्वराचे दूत म्हणतात. हे अवतारी पुरुष मानव जन्माचे इप्सित ध्येय म्हणजेच ईश्वर प्राप्ती साध्य करण्याकरता आपल्या कालखंडामध्ये संपूर्ण मानवजातीचे नेतृत्व करतात. झरतृष्ट्र, प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर यांना अवतार म्हणून ओळखले जाते आणि अनेक लोक त्यांची पूजा करतात. ते सहजपणे अशा प्रकारचे जीवन जगतात की ज्या योगे साधारण लोकांना सद्विचार, सद् वाणी आणि सत्कर्म युक्त जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. निरागस प्रेम आणि परस्पर बंधुभाव समाजामध्ये सहजपणे प्रस्थापित होतो. ज्याचा शोध कळत नकळतपणे सर्वजण घेत असतात, अशा सुख, शांती, समाधानाच्या खजिन्याचा सहज सोपा मार्ग सापडतो.
या युगातले पाच सद्गुरु साईबाबा, हजरत बाबाजान, ताजुद्दिन बाबा, उपासनी महाराज आणि नारायण महाराज यांनी सांप्रत कालचक्राच्या शेवटच्या युगात परमेश्वराला पाचारण केले. त्या अनुषंगाने मेहेर बाबांचा जन्म 25 फेब्रुवारी 1894 ला झाला. सर्व प्रथम हजरत बाबाजान यांनी 1913 - 1914 मध्ये युवा अवस्थेतील मेहेर बाबांना त्यांच्या आज्ञा चक्रा च्या ठिकाणी म्हणजे भृकुटी मध्याचे चुंबन घेत त्यांच्या चेतने वरील मायेचा पडदा दूर केला आणि त्यांचे सभोवताली असलेल्या सृष्टीचे भान हरपले. त्या क्षणापासून केवल चैतन्य असलेला अनंत आनंदाचा अनुभव मेहेर बाबा अविरतपणे घेत होते. 1914 ते 1921 या सात वर्षांच्या कालावधीत उपासनी महाराजांनी मेहेर बाबांचा अनंत आनंदाचा अनुभव कायम ठेवत हळूहळू त्यांचे सृष्टीचे भान पुन्हा परत आणले. आणि मेहेर बाबांना या युगाचे अवतार म्हणून स्पष्टपणे घोषित केले. पाच ही सद्गुरुंनी त्यांच्या वैयक्तिक भेटीमध्ये मेहेरबाबांना या युगाचे अवतार घोषित करत त्यांच्यावर विश्वकार्याची जबाबदारी सोपवली.
जानेवारी 1922 पासून मेहेर बाबांनी अवतार कार्याला सुरुवात केली. आपल्या अवतार कार्याच्या सुरूवातीला ज्यांचा माध्यम म्हणून उपयोग करावयाचा आहे अशा शिष्य मंडळींना त्यांनी गोळा केले. त्यांना आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक उच्च अवस्थेची जाणीव निरनिराळ्या प्रसंगांमधून करून दिली. त्या शिष्य मंडळींना असे जाणवले की मेहेरबाबा हे प्रेमाचा महासागर आहेत एवढेच नाही तर ज्याच्यावर आपण प्रेम करावे असे जगातले ते एकमेव व्यक्तिमत्व आहे. हे सर्व स्त्री पुरुष शिष्यवर्ग विभिन्न धर्मातले तसेच विविध जाती मधले, निरनिराळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीतले होते. 1922 ते 1925 या कालावधीमध्ये बाबांनी आपल्या या शिष्य मंडळींची तयारी करवून घेतली. विविध प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक कार्यांमध्ये त्यांना सहभागी केले. हे करत असताना आज्ञा पालन आणि प्रेम यांचे महत्त्व त्यांच्या हृदयावर बिंबवले. सद्गुरु च्या कार्याचा अपेक्षित परिणाम साधावयाचा असेल तर सद्गुरु ने दिलेल्या आज्ञेचे पालन शब्दशः, क्षणार्धात, मनापासून आणि सहर्षतेने व्हायला हवे असा त्यांचा अट्टाहास होता. या दरम्यान मेहेर बाबांनी सेवेतील प्रभूताई हे घोषवाक्य आपल्या कृतीमध्ये स्पष्ट केले. अन्नदान, दवाखाना, शाळा, कुष्ठ रोग्यांसाठी आश्रम असे नानाविध प्रकल्प आश्रमात सुरू केले. आध्यात्मिक गूढ गोष्टी ते सहजपणे आपल्या शिष्य मंडळींना सांगत. त्यांचा आवाज अतिशय मधुर होता आणि ते संतांनी रचलेले अभंग गायचे; खास करून तुकाराम महाराजांचे अभंग त्यांना विशेष प्रिय होते. ते अतिशय बोलके होते. आपल्या नर्म विनोदाने आपल्या आजूबाजूचे वातावरण जिवंत आणि हलकेफुलके ठेवत असत.
शिष्य परिवार आणि आश्रमाचा आवाका वाढल्यानंतर सर्व शिष्य मंडळींना आणि गावकऱ्यांना असं वाटलं हे असंच जीवन आता नेहमीसाठी सुरू राहणार. परंतु जून 1925 मध्ये मेहेर बाबांनी जाहीर केले की ते 10 जुलै 1925 पासून एक वर्षाकरिता मौन धारण करतील. या काळात ते एकही शब्द उच्चारणार नाहीत एवढेच नाही तर कुठलाही ध्वनी त्यांच्या मुखातून बाहेर पडणार नाही. हे मौन म्हणजे त्यांच्या विश्व कार्याचा एक भाग म्हणून त्यांनी धारण केलेले आहे.
त्यानंतर अनेक वेळा त्यांनी आपले मौन सोडणार असे म्हटले परंतु शरीर सोडेपर्यंत कधीही हे मौन सोडले नाही. एवढेच नाही तर 1952 साली अमेरिकेमध्ये आणि 1956 साली भारतामध्ये त्यांना दोन मोठे मोटार अपघात झाले; परंतु त्यांच्या मुखातून एक हुंदका सुद्धा बाहेर पडला नाही.
आपल्या सर्वांचा असा अनुभव आहे की प्रत्येक अवताराचे एक विशिष्ट लक्षण किंवा सांकेतिक रूप आहे; जसे प्रभू रामचंद्रांचे स्मरण करायचे तर कोदंड धारी राम नजरेसमोर येतात, मोरपीस आणि बासुरीने श्रीकृष्णाचे स्मरण होते, ध्यान मुद्रेने भगवान गौतम बुद्ध डोळ्यासमोर येतात तसेच मेहेर बाबा आणि मौन यांचं नातं आहे.
मेहेर बाबांनी जेव्हा घोषित केले की ते मौन धारण करणार आहेत तेव्हा त्यांच्या शिष्य मंडळींनी त्यांना विचारलं की यानंतर आम्हाला तुमचे संदेश कसे द्याल किंवा तुम्ही आम्हाला कसं शिकवाल. त्यावर बाबांनी म्हटलं की मी शिकवायला नाही तर जागृत करण्याकरता आलेलो आहे. (I have come not to teach but to awaken). मेहेर बाबा म्हणतात की माझं मौन म्हणजे कुठलीही तपश्चर्या नाही किंवा मी कुठलेही व्रत घेतलेले नाही. ज्या वेळेला आपण इतिहास काळातील इतर महान व्यक्तींनी धारण केलेलं मौन पाहतो तेव्हा असं लक्षात येते कि स्वतःच्या साधने करता किंवा आत्मशुद्धीकरता त्यांनी मौन धारण केलंय. बहुदा त्यांनी हे मौन आत्म साक्षात्कार प्राप्त होण्याच्या आधी किंवा प्राप्त करण्या करिता धारण केलेलं असतं. परंतु मेहेर बाबांचे मौन हे आत्म साक्षात्कार झाल्या नंतरचं आहे; एक दैवी कार्य किंवा दैवी कर्तव्य पार पाडण्याकरता हे मौन त्यांनी धारण केलेलं होतं. त्यांनी स्वतःचे आत्मिक बल किंवा दैवी शक्ती वाढविण्यासाठी नाही तर इतरांना अध्यात्मिक उन्नती प्राप्त करून देण्यासाठी किंवा प्रगती प्राप्त करण्यात मदत करण्यासाठी आपल्या मौनाचा वापर केला. याचा वैयक्तिक अनुभव शिष्य परिवार सांगत असत. इतरांसाठी हे मौन म्हणजे आपल्या मनातील विचारांच्या कोलाहलाशी केलेला संघर्ष आणि यावर प्राप्त केलेला विजय आहे तर मेहेरबाबांचे मौन म्हणजे ईश्वर प्रेमींवरच्या प्रेमाखातर स्वतःवर ओढवून घेतलेल्या कष्टाची मालिका आहे. इतरजनांचे मौन 12 वर्षे, 24 वर्षे किंवा 36 वर्षे अशा काल मर्यादेची सीमा बांधून केलेलं व्रत किंवा तपश्चर्या असते तर मेहेर बाबांच्या मौनाला कालमर्यादेचे कुठलेही बंधन नाही.
मेहेर बाबा 1956 मध्ये अमेरिकेला गेले असताना तिथल्या पत्रकारांनी त्यांच्या मौनावर काही प्रश्न विचारले. त्या संवादामध्ये मेहेरबाबांचे स्वतःचे आपल्या मौनाबद्दल काय म्हणणं आहे ते कळून येईल.
पत्रकार: आपल्या अखंड मौनाबद्दल आम्ही अनेक संदेश ऐकले आणि वाचले, परंतु तुम्हाला कोणते एखादे वाक्य जे सगळ्यात महत्त्वाचे आहे असे वाटतं?
मेहेर बाबा: जेव्हा मी माझं मौन सोडेल तेव्हा पूर्ण जगाला कळून येईल की मीच तो एक आहे ज्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.
पत्रकार: कोणत्या प्रेरणेने तुम्ही मौन सुरू केलं? तुमच्या मौनाची प्रेरणा कुठली?
मेहेर बाबा: माझं मौन सोडल्यानंतर जगाला कळून यावं की मी कोण आहे (हिच ती प्रेरणा).
पत्रकार: कुठल्या प्रसंगाने तुम्ही मौन झालात? तुम्हाला काही दृष्टांत किंवा दैवीवाणी असं काही झालं का?
मेहेर बाबा: माझं स्वयंभू ज्ञान. मला याबद्दल विचार करावा लागत नाही; मला ते माहीतच असतं. जेव्हा मी प्रथम मौन सुरू केलं तेव्हाच मला माहित होतं की जेव्हा मी मौन सोडेल तेव्हा जगाला कळेल की मी कोण आहे, आणि अशा रीतीने मी मौन सुरू केलं.
पत्रकार: असं म्हटल्या जातं की अनेक जण जे बरेच वर्ष मौन असतात ते नंतर बोलू शकत नाहीत; तुम्हाला असं वाटतं का की ज्या वेळेला तुम्हाला मौन सोडायचं असेल त्यावेळेला तुम्ही बोलू शकाल?
मेहेर बाबा: शंभर टक्के!
पत्रकार: हे तुम्ही खात्रीने कसे सांगू शकता?
मेहेर बाबा: कारण मला ते माहिती आहे.
मी जेव्हा माझा मौन सुरू केले तेव्हा मी लिहिणे बंद केले; नंतर वाचनही बंद केले. मी वर्णाक्षर अंकित असलेल्या फळीचा वापर केला. जेव्हा लोक माझ्या जवळ यायचे त्यांना मी या वर्णाक्षराच्या फळीद्वारे समजावून सांगायचो. लोक हजारोंच्या संख्येने, कधी कधी तर दहा दहा हजारांच्या संख्येत माझ्याकडे यायचे आणि शांतपणे अशा प्रकारे दिलेला माझा संदेश ऐकायचे. नुकतेच मी वर्णाक्षराच्या फळीद्वारे बोलणंही सोडलं आहे आणि केवळ माझ्या हावभावा द्वारे मी त्यांच्याशी संवाद साधत आहे.
तुम्हा सर्वांना भेटून मला फार आनंद होत आहे.
मेहेर बाबांसोबत जे लोक होते किंवा जे त्यांच्या संपर्कात आले त्या सर्वांना दैनंदिन व्यवहार करताना मेहेर बाबा मौन आहेत आणि आपल्याशी बोलत नाहीत असं कधीही जाणवलं नाही.
अनोळखी व्यक्तींना सुद्धा मेहेरबाबांशी संवाद साधताना कुठलीही अडचण आली नाही. एकदा एक योगी मेहेरबाबांकडे काही अध्यात्मिक गूढ गोष्टी विचारायला आले; त्याकरता त्यांनी एक प्रश्नावली सुद्धा लिहून आणली होती. मेहेरबाबांना भेटल्यावर त्यांना जाणवलं की त्यांच्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे त्यांना मिळाली.
मेहरबाबांना कोणी प्रश्न केला की तुम्ही आपले मौन कधी सोडणार? यावर मेहेर बाबा म्हणतात की परमेश्वर अविरतपणे आपले कार्य मौनपणे करित असतो; सर्वांच्या नकळत, नि:शब्द राहून. याला अपवाद फक्त अशा ज्ञानी जनांचा आहे जे त्या परमेश्वराचे अनंत मौन सतत अनुभवत असतात.
जर माझे मौन बोलू शकत नसेल तर जिभेद्वारे दिलेले भाषण काय कामाचे? ज्या क्षणी त्या परमेश्वराला असे वाटेल की माझी वाणी संपूर्ण विश्व ऐकेल तेव्हा तो मला माझे मौन सोडायला लावेल.
परमेश्वराचा पहिला शब्द होता कोऽहम (मी कोण आहे) आणि अंतिम शब्द आहे सोऽहम (मी परब्रह्म आहे). आणि तो शब्द जो मी, ईश्वरी पुरुष, लवकरच उच्चारणार आहे तो माझ्या अनंत मौनाचा नाद असेल.
मेहेर बाबा आपल्या संदेशात असे म्हणतात की यावेळी मी जो तुमच्यामध्ये वावरतो आहे तो तुम्हाला शाब्दिक ज्ञान देण्याकरता नाही. माझी अशी इच्छा आहे की तत्त्वज्ञानामध्ये आपल्या बुद्धीचा कस लावण्यापेक्षा तुमच्या हृदयाची द्वारे माझे प्रेम स्वीकारण्या करता उघडी व्हावीत. मला तुम्हाला जे द्यायचे आहे ते निव्वळ शाब्दिक ज्ञानाद्वारे द्यायचे नाही. तुमच्या संपूर्ण समर्पणाच्या मौना मधूनच माझे प्रेम, जे सतत मौन असते, ते तुमच्या पर्यंत प्रवाहित होऊ शकते; त्या प्रेमाचा ठेवा तुम्ही जतन करावा आणि इतर ईश्वराचा शोध घेणाऱ्या साधकांमध्ये वाटावा. तसेही ज्याला खरा अर्थ आहे असे सर्व मौना मधूनच दिल्या आणि स्वीकारल्या जाते.
10 जुलै 1958 ला म्हणजेच मौन धारण केल्यानंतर 33 वर्षांनी मेहेर बाबांनी विश्वव्यापी संदेश दिला. त्याच्या सुरुवातीला पुन्हा बाबा म्हणतात की मी शिकवण्याकरिता आलो नाही जागृत करण्याकरिता आलेलो आहे. आधीच्या अवतार काळात मी अनेक संदेश आणि तत्वज्ञान सांगितलेले आहेत परंतु मानव जातीने त्याकडे दुर्लक्ष केले. आता त्या शिकवणी प्रमाणे प्रत्यक्ष जीवन जगण्याची, ते शब्द कृतीमध्ये आणण्याची आवश्यकता आहे.
मी कुठलेही तत्वज्ञान नव्याने प्रतिपादन करण्यासाठी आलेलो नाही परंतु जेव्हा मी त्या सत्याची सरिता प्रसारित करील त्यावेळेला लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि कृतीमध्ये मी न बोललेले शब्द व्यक्त होतील. मी जेव्हा माझे मौन सोडील त्यावेळेला माझ्या प्रेमाचा धक्का विश्वात्मक असेल आणि सृष्टीतील सर्व जीवांना ते प्रेम समजेल, जाणवेल, त्या प्रेमाचे ते स्वागत करतील. प्रत्येक व्यक्तीला हे प्रेम स्वतःच्या बंधनातून स्वतःच्या पद्धतीने मुक्त करण्यासाठी सहाय्यभूत ठरेल. मीच तो दैवी प्रियतम आहे जो तुमच्यावर तुम्ही स्वतःवर कधीही जेवढे प्रेम करू शकाल, त्यापेक्षाही जास्त प्रेम करणारा आहे. माझा मौन भंग तुम्हाला स्वतःहून तुमचे स्वतःचे यथार्थ स्वरूप जाणून घेण्याकरता सहाय्यभूत ठरेल.
माझे मौन आणि आणि नजीकच्या काळातील माझे मौन सोडणे हे मानव जातीला त्यांचे अज्ञान मुलक विशाल शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी तसेच विश्वात्मक ऐक्याची दैवी योजना फलद्रूप करण्यासाठी आहे. माझा मौन भंग मानव जातीला परमेश्वराच्या विश्वव्यापी एकत्वाचे आकलन करून देईल आणि एकाच परमेश्वराची लेकरे या अर्थाने मानवा मानवामध्ये विश्व बंधुत्वाचे नाते निर्माण होईल. यासाठी माझे मौन आवश्यक होते आणि मौन भंग ही आवश्यक आहे - जो लवकरच घडेल.
मेहेर बाबांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की दरवर्षी मौन दिनाच्या स्मरणार्थ जगभरातले जे लोकं मेहेर बाबांवर प्रेम करतात किंवा जे मेहेर बाबांवर प्रेम करण्याची ईच्छा व्यक्त करतात त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्थानिक वेळेनुसार नऊ जुलै च्या मध्यरात्रीपासून ते दहा जुलै च्या मध्यरात्रीपर्यंत 24 तास संपूर्णपणे मौन धारण करावं. त्यांच्या ईच्छेचा सन्मान राखत आपण सर्वजण यावर्षी 9 जुलै च्या मध्यरात्रीपासून दहा जुलै च्या मध्यरात्रीपर्यंत मौन राहून मेहेर बाबांचे स्मरण करू या.
अवतार मेहेर बाबा की जय !!!
साभार : पत्रकार श्री मदने ,CT News काटोल यांचा लेख.

25
901 views