
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली जिल्यातील कोनसरी येथील लॉयल्ड मेटल अँड एनर्जी लिमिटेड च्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन व उदघाटन
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली जिल्यातील कोनसरी येथील लॉयल्ड मेटल अँड एनर्जी लिमिटेड च्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन व उदघाटन
पाच वर्षात गडचिरोली येणार दरडोई उत्पन्नात ‘टॅाप 10’मध्ये
मु्ख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
गडचिरोली : गडचिरोलीची ‘स्टील हब’च्या दिशेने वाटचाल होत असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात लोह उद्योग प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. त्यातून त्यांचे जीवनमानात बदल घडून गडचिरोलीत परिवर्तन घडत आहे. आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न राज्यात सर्वात कमी असले तरी पुढील 5 वर्षात गडचिरोली जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊन हा जिल्हा राज्यातील पहिल्या 10 जिल्ह्यात असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडच्या (एलएमईएल) एकात्मिक स्टिल प्रकल्पाची पायाभरणी आणि विविध प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. यात हेडरी येथील 5 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा आयर्न ओर ग्राइंडिंग व पेलेट प्लांट, हेडरी ते कोनसरी दरम्यानची 85 किलोमीटर लांबीची आणि 10 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेची स्लरी पाइपलाइनचे उद्घाटन, तसेच कोनसरी येथील 100 खाटांच्या रुग्णालयाची पायाभरणी, सीबीएसई स्कूलची पायाभरणी आण लॅायड्सच्या सोमनपल्ली येथील टाऊनशिपची पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोटने करण्यात आली. गडचिरोलीला ‘स्टील हब ऑफ इंडिया’ बनविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, पद्मश्री पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या तुलसी मुंडा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक निलोत्पल, लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, माजी खासदार डॅा.अशोक नेते, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, माजी आ.डॅा.देवराव होळी, माजी आ.कृष्णा गजबे, कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपण चीनशी स्पर्धा करू शकतो : प्रभाकरन
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बी.प्रभाकरन म्हणाले की, एकात्मिक पोलाद प्रकल्पाचे काम येत्या 30 महिन्यांत पूर्ण होईल. त्यापूर्वी आम्हाला अतिविशेषोपचार रुग्णालय आणि शाळेचे काम पूर्ण करायचे आहे. सरकारने सहकार्य केल्यास आम्ही पोलाद गुणवत्तेत आणि दर्जामध्ये चीनशी स्पर्धा करू शकतो, असा ठाम विश्वास यावेळी प्रभाकरन यांनी व्यक्त केला.
स्थानिक लोकांशी भावनिक संबंध जोडत प्रभाकरन यांनी त्यांचे बहुतांश भाषण मराठीत केले. उपस्थितांनी टाळ्यांनी त्याचे कौतुक केले. त्यांनी कंपनीच्या गडचिरोलीतील आतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, एलएमईएलने प्रशिक्षित केलेल्या 1500 लोकांना एलटी गोंडवाना मार्फत रोजगार मिळाला आहे आणि आणखी 3,000 लोकांना प्रशिक्षण दिले जात आहे. ईएसओपी अंतर्गत, आतापर्यंत कामगारांसह 10,600 कर्मचाऱ्यांना कंपनीचे समभाग मिळाले आहेत, ज्यामुळे ते केवळ कामगारच नाहीत तर कंपनीचे भागधारक देखील बनले असल्याचे प्रभाकरन म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलएमईएलमध्ये नियुक्त झालेल्या एकूण 1400 तरुणांपैकी प्रतिनिधीक स्वरूपात चार तरुणांना नियुक्तीपत्रे प्रदान केली. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने प्रायोजित केलेल्या, आॅस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवडलेल्या तिसऱ्या तुकडीच्या 6 उमेदवारांना त्यांनी बोर्डिंग पास देखील प्रदान केला. युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतलेल्या 50 पैकी पाच विद्यार्थ्यांना फडणवीस यांनी पत्रे प्रदान केली. त्यांनी एकूण 600 कामगारांपैकी प्रतिनिधीक स्वरूपात पाच जणांना शेअर प्रमाणपत्रे प्रदान केली. तसेच त्यांनी ‘लॉयड्स अँथम’ लाँच केले.
माओवादातून बाहेर येऊन विकास प्रक्रियेत सहभागी व्हा
माओवादग्रस्त जिल्ह्याची ओळख पुसली जात असल्याचे सांगत उर्वरित माओवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात यावे, तसेच ‘शहरी माओवादा’पासून सावध राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. गडचिरोलीचा विकास सुरू झाला असताना आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या, मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या. अशा अफवांपासून सावध राहा, कारण त्या लोकांना विकासापासून दूर ठेवण्यासाठी पसरवल्या जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोलीवरील आत्मियतेचे कौतुक केले. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हजारो लोकांना भेटण्याची उत्सुकता असतानाही मुख्यमंत्री गडचिरोलीत उपस्थित राहिले हे या जिल्ह्याप्रती असलेल्या त्यांच्या आपुलकीचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेचा त्यांनी उल्लेख केला. विकासाच्या या प्रवाहात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.