logo

नवापूर तालुक्यात शबरी घरकुल योजनेत दिरंगाई, सरपंच संतप्त..!पंचायत समितीकडे तीव्र आंदोलनाचा इशारा!

नवापूर तालुक्यात शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईमुळे लाभार्थ्यांना अजूनही घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने तालुक्यातील सरपंचांनी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे. प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत सरपंचांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
2022-2023 या आर्थिक वर्षात नवापूर तालुक्यासाठी 2483 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. मात्र केवळ 1783 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यातील 64 घरकुलांची पडताळणी अद्याप अपूर्ण असून, 116 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायतींना उद्दिष्टच देण्यात आलेले नाही.
2023-2024 या आर्थिक वर्षात देखील 4493 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त असून फक्त 2679 नोंदणी झाली आहे. त्यापैकी 558 घरकुलांची पडताळणी रखडली आहे. यामध्ये देखील 40 ग्रामपंचायतींना अजून उद्दिष्ट दिले गेलेले नाही.योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी वेळोवेळी अर्ज व कागदपत्रे सादर करूनही त्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे घरकुलाचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. यामुळे नवापूर तालुक्यातील अनेक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य संतप्त झाले असून येत्या पंधरवड्यात जर कारवाई झाली नाही, तर उद्दिष्ट प्राप्तीसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सरपंचांनी स्पष्ट सांगितले की, शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून वेळोवेळी त्रुटींची पूर्तता करून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून दिरंगाई केली जात आहे. योजनांचे उद्दिष्ट असतानाही गरजूंना हक्काचे घर मिळत नसल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.या बैठकीस नवापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

12
78 views