साखरखेर्डा येथे चोरट्याचा धुमाकूळ,चार घरे फोडली लाखोचे नुकसान ! चोरटे सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद : परिसरात भीतीचे वातावरण !
साखरखेर्डा येथे चार ठिकाणी घरफोडी , नगदी रोख रक्कमेसह मौल्यवान वस्तूवर डल्ला साखरखेर्डा ( वार्ताहर ) येथील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या काही घरांची कुलूपे तोडून अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालीत रोख रक्कमेसह मौल्यवान दागिने लंपास केली आहे . साखरखेर्डा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे . साखरखेर्डा येथील वार्ड क्रमांक ५ मधील राजू ठोंबरे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील नगदी रोख सात हजार रुपये आणि गहू पोत , सोन्याची दागिने , क्षिरसागर बंधूंची दोन्ही घरे फोडून दोन हजार रोख , आणि सोन्याचे दागिने चोरीला गेले आहे . वार्ड क्रमांक एक मधील सोहेल आशपाक खान या़च्या घराचे कुलूप तोडून घरातील नगदी २५ हजार रुपये आणि चांदीचे दागिने चोरीला गेले असल्याचे त्यांनी सांगितले आहे . सदर अज्ञात चोरट्यांनी कुलूप बंद घराची टेहळणी करुन उपरोक्त घरांचे नुकसान केले आहे . घरफोडी करताना आरोपींनी बाजुच्या घरांच्या कड्या बाहेरुन बंद केल्या होत्या . चौघेही बाहेर गावी गेल्याने त्याची संधी चोरट्यांनी साधली . या अगोदर मागिल वर्षी सुध्दा मदन गोडाले आणि शिक्षक काॅलनीत सुध्दा एकाच दिवशी चार ते पाच घरे फोडून लाखोची घरफोडी केली होती . सर्व चोरटे सी सी टीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत . सर्व आरोपींनी तोंडावर मास्क , हातात पांढरे हॅडग्लोज , घातलेले होते . सोहेल आशपाक खान यांच्या तोंडी तंक्रारीवरुन साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल रमेश तुपकर यांनी अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३३१(१) , ३०५ भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला आहे . सोन्या चांदीच्या दागिने खरेदीची पावती तंक्रारदार यांच्याकडे नसल्याने पोलिसांनी तंक्रारीत त्याची नोंद केली नाही . त्यामुळे यानंतर मौल्यवान दागिने खरेदी करताना सोनाराकडून पावती घेणे आवश्यक आहे . पावती नसल्यास पोलिस त्याची दखल घेत नाही . हे स्पष्ट होते . या घटनेचा तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल बाजीराव वाघ करीत आहेत .