logo

" गारुडी मुक्त नागपंचमी" – एक सकारात्मक पर्यावरणीय परिवर्तनाची यशोगाथा.

ठाणे | प्रतिनिधी –
कधीकाळी नागपंचमीच्या सणात गारुड्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सापांची नाहक कत्तल केली जात होती. पण सर्पप्रेमी आणि वनविभागाच्या एकत्रित प्रयत्नांतून या प्रथेला आळा घालण्यात यश मिळाले असून, आज "गारुडी मुक्त नागपंचमी" साजरी होत आहे – हे एक सकारात्मक सामाजिक व पर्यावरणीय परिवर्तनाचे उत्तम उदाहरण आहे.

इ.स. १९८५ ते १९९० दरम्यान 'भारतीय सर्प विज्ञान संस्था, पुणे' या संस्थेचे संस्थापक श्री. निलिमकुमार खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात सर्पमित्र म्हणून कार्याला सुरुवात झाली. श्री. बिपिन रणदिवे यांचेही या कार्यात मोलाचे योगदान लाभले. पुढे २००४ मध्ये ‘निसर्ग विज्ञान संस्था, डोंबिवली’ची स्थापना करण्यात आली.

त्या काळात नागपंचमीच्या निमित्ताने दरवर्षी अंदाजे २५,००० ते ३०,००० साप मृत्युमुखी पडत असत. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून आलेले गारुडी नाग, धामण, रजतबंसी, अजगर अशा अनेक जातींचे साप घेऊन मुंबई परिसरातील रेल्वे स्थानकांपासून गावागावांतील देवळांपर्यंत पूजेसाठी फिरत. सापांना दूध पाजले जाई – परंतु ते त्यांच्या पचनासाठी घातक असल्यामुळे अनेक साप काही दिवसांतच दगावत.

त्याच काळात सापांच्या कातड्याची तस्करीही वाढली होती. हे लक्षात येताच वनविभागाने कारवाई सुरू केली. नागपंचमीच्या काळात साप ताब्यात घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्याच प्रमाणे नागाच्या मुर्ति वाटत करण्यात आल्या होत्या . या मोहिमेत मा. उपवनसंरक्षक (वन्यजीव) श्री. जाफरी, श्री. नितीन काकोडकर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे DFO श्री. भारती यांचे मार्गदर्शन लाभले.

ठाणे जिल्ह्यातील सर्पमित्रांनी वनविभागासोबत एकत्र येत एक पथक तयार केले. यात सखाराम कांबळे, रघुनाथ वाकळे, विनायक जाधव यांच्यासह सचिन जोशी, उल्हास ठाकूर, भाई तारकर, विजय अवसरे, भरत जोशी, फैजल मुजावर, कैलास दारोळे, विजय (पिंट्या) कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, अमित चव्हाण, प्रसाद शहा, चंद्रकांत कंग्राळकर, दत्ता बॉम्बे, गणेश मेहंदळे, केदार भिडे, मनिष पिंपळे, दिलीप राहुरकर, संतोष उदरे, विनय पाटणकर, किरण पाटील, सुरेश गीत , विनायक गंधेरे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले.

नवीन पिढीतील सर्पमित्रांमध्ये सौरभ मुळे, अमित पाटील, गौरव कारंडे, गौरव घरत, राहुल जगन्ना, ओजस ठोंबरे, सुरज कापसे, विकास गौर, निहार सकपाळ, अमृता चुटके, कुणाल शहा यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरतो आहे.

त्या काळात सोशल मीडिया नव्हता. वर्तमानपत्रांमध्ये बातमी येईलच याची खात्री नसायची. मात्र सर्पमित्रांनी प्रबळ इच्छाशक्ती आणि समर्पणाच्या जोरावर नागपंचमीचा चेहरामोहरा बदलून टाकला.

आज सोशल मीडियावर सर्प हाताळणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, मात्र त्यामध्ये सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न झाल्याचे दिसून येते. त्यामुळे नवोदित स्वयंसेवकांनी प्रशिक्षित मार्गदर्शनाखाली सर्पमित्र म्हणून कार्य करावे, असे आवाहन केले जात आहे.

"गारुडी मुक्त नागपंचमी" ही संकल्पना यशस्वी झाल्याचे आज पाहायला मिळते, आणि या यशाचे श्रेय ठाणे वनविभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच विविध पिढ्यांतील समर्पित सर्पमित्रांच्या अथक कार्याला जाते.

✍️ लेखक: वैभव पद्माकर कुलकर्णी
संस्थापक सदस्य – निसर्ग विज्ञान संस्था, डोंबिवली
सर्पमित्र – ठाणे जिल्हा


140
7277 views