logo

मराठा सेवा संघाच्या वधू वर कक्षाने परिचय मेळाव्यांची व्याप्ती वाढवावी .........आ. सुरेश धस

समाजामध्ये विवाह जुळवणे अत्यंत अवघड काम झाले आहे. मध्यस्तांची संख्या कमी झाली. नात्यागोत्यामध्ये आपसात संवाद राहिला नाही. म्हणून वधू वर परिचय मेळाव्यांची गरज भासू लागली आहे. मराठा सेवा संघाने आशा वधू वर मेळाव्यांची व्याप्ती वाढवावी असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले. आष्टी येथे आयोजित मराठा वधू वर व परिचय मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते .
पुढे बोलताना आ. धस म्हणाले की, मराठा समाजातील लोक विवाह समारंभावर प्रचंड खर्च करतात. हा खर्च कमी झाला पाहिजे. यासाठी सुद्धा मराठा सेवा संघाने पुढाकार घ्यावा .मध्यंतरीच्या काळामध्ये स्त्रीभ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे मुलींची संख्या कमी झाली. त्याचा दुष्परिणाम आज समाज भोगत आहे. तरीसुद्धा उच्चशिक्षित मुलींची संख्या उच्चशिक्षित मुलांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे शेतकरी मुलांना मुली मिळत नाहीत .पण आता शेती विकणारांची संख्या कमी झाली. आणि युवक शेती करणे पसंत करू लागले आहेत. तांत्रिक पद्धतीने शेती करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. शेतीमध्ये नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळू लागले आहे. म्हणून शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत असेही ते म्हणाले.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये इंजि.तानाजी जंजिरे म्हणाले की मराठा समाजाच्या विवाह विषयक अडचणी सोडवता याव्यात म्हणून सदरचा मेळावा आम्ही आयोजित केला आहे. यापुढे लवकरच अंबाजोगाई, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, पुणे ,शिर्डी आदी ठिकाणी मराठा समाजाची मोठे आणि भव्य असे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत .
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये वृद्धेश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी सल्लागार जे. आर .पवार साहेब म्हणाले की, मुला-मुलींचे लग्न वेळेवर होत नसल्यामुळे समाजावर मोठे संकट येऊ घातले आहे. आपला मराठा समाजच अल्पसंख्याक समाज होण्याच्या मार्गावर आहे. पुढे ते म्हणाले की काळाची गरज ओळखून आंतरजातीय विवाह करणे सुद्धा गरजेचे आहे. यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकजी ठाकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई माने, विभागीय उपाध्यक्ष सुवर्णाताई गिरे, बीड जिल्हाध्यक्ष संगीताताई शिंदे, प्राचार्य शशिकांत कनेरे, शिवाजी पाचे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन दिनेश पोकळे व प्राचार्य डॉ. बाबासाहेब मुटकुळे यांनी केले .
परिचय मेळाव्यामध्ये 104 मुला-मुलींनी त्यांच्या पालकासह सहभाग नोंदवला. परिचय मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. अशोक उढाने ,चेअरमन शिरीषभाऊ थोरवे व ज्येष्ठ पत्रकार ॲड.सीताराम पोकळे यांनी केले .मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवश्री लक्ष्मण रेडेकर शिवश्री, भास्कर निंबाळकर, शिवश्री सुरेश पवार, ॲड .संजय जगताप, शिवश्री दीपक पोकळे, शिवमती संगीता पोकळे , शिवश्री बन्सीधर मोरे.विशाल खंडागळे, प्रा. डॉ.दत्ता नरसाळे, ऋषिकेश खंडागळे शिवश्री दीपक पोकळे, शिवमती जयश्री पोकळे आदींनी परिश्रम घेतले.

17
236 views