
आजचा सत्कार उद्याची लढण्याची उमेद देणारा : आ. शशिकांत शिंदे
पनवेल राष्ट्रवादीच्यावतीने शशिकांत शिंदेंचा जाहीर सत्कार
"नव्या पर्वाची मुहूर्तमेढ" या टॅगलाईनखाली जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांचे आयोजन
पनवेल : राज भंडारी
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री व महाराष्ट्र विधानपरिषदेचे लोकप्रिय आमदार शशिकांत जयवंतराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) च्या “महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष” पदी निवड झाली. शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्या या निवडीबद्दल त्यांचा पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांच्याहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. बुधवार दि. ३० जुलै, २०२५ रोजी सायंकाळी ८-०० वाजतां सुधागड विद्यासंकुल कळंबोलीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित माथाडी कामगार तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आ. शशिकांत शिंदे यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, आजचा सत्कार हा उद्यासाठी लढण्याची नवीन उमेद देणारा आहे. यावेळी माथाडी कामगारांचे नेते गुलाबराव जगताप, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर आदिंसह प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, निष्ठेने राहिलो म्हणून मंत्री नाही पण पक्षाचा अध्यक्ष झालो आहे. एक माथाडी कामगारांचा मुलगा राष्ट्रवादी पक्षातून शरदचंद्र पवार साहेबांच्या आशीर्वादाने आमदार होतो, मंत्री होतो आणि आता त्याच पक्षाचा अध्यक्ष होतो. या पदाला न्याय देण्यासाठी नुसतं पद घेण्यापेक्षा लोकांमध्ये सत्य काय आहे, हे दाखवून जाणीव करू देण्यासाठी जनजागृती गरजेची असल्यामुळे मी माझ्या दैनंदिन कामातील आठवड्यातील दोन दिवस प्रत्येक विभागात देण्यासाठी तयार झालो आहे. जिथे जिथे अन्याय होतो, तिथे पहिला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता दाखल होऊन लढला पाहिजे, ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. तसेच आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून देखील मी हीच अपेक्षा बाळगतो.तरुणांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, या देशाला दिशा दाखविण्याचे काम फक्त महाराष्ट्राने केलं आहे, त्यामुळे आता आपण आपल्या घरापासून ते आपल्या परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन या देशाला योग्य दिशेकडे नेण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मस्ती चढलेल्या राजकारण्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाविकास आघाडी म्हणूनच झाल्या पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्नशील असणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.
ना संघर्ष ना तकलीफ, तो क्या मजा हैं जिने में | बडे बडे तुफान भी थम जाते हैं, जब आग लगी हो सिने में | या शायरीने आपल्या मनोगतला राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सुरुवात करताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारू लागला. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पैशाच्या आणि इव्हीमच्या जीवावर निवडून आलेले सत्ताधारी आपण बघतोय, पण येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये ही चूक आपल्याला आता परत करायची नाही, आपण जर चांगली मोट बांधली, तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील याठिकाणी असणारे कार्यकर्ते आपल्या पाठीशी राहून नेतृत्व करतील, आणि आपला संघर्षाचा काळ कमी होईल, असे मला वाटते. यावेळी मेहबूब शेख यांनी घोडा या प्राण्यासारखं काम करण्याची उपमा पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी स्पष्टीकरणासहीत बोलताना त्यांनी सांगितले की, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आपल्याला घोड्यासारखं काम करायचं आहे, घोडा झोपला तरी उभ्या उभ्या झोपतो, तसें दिवसातले १० तस जरी आपण साधं चहाच्या टपरीवर जरी लोकांमध्ये जनजागृती केली आणि घोड्यासारखं काम केलं तरी लोकांना या गोष्टी पटतील आणि आपला संघर्षाचा काळ संपुष्टात येऊ शकतो. आता दुसरा घोडा शब्द हा एवढ्यासाठीच सांगतोय तो म्हणजे उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीत हा भारतीय जनता पार्टीला लावायचा आहे. आणि हे तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आपण येणारे तीन महिने घोड्यासारखं काम कराल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र लिहिण्याऐवजी "महाराष्ट" असा उल्लेख
पनवेल शहर जिल्ह्याच्यावतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या भव्य जाहीर सत्कार सोहळ्याच्या आयोजनात महाराष्ट्र राज्याचा अवमान देखील करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लिहिण्याऐवजी "महाराष्ट" असा उल्लेख केल्याने अनेक महाराष्ट्र प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
चौकट
राष्ट्रवादीचा शेकापसोबत डबल ढोलकीचा खेळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतिश पाटील हे पनवेल - उरण महाविकास आघाडीचे एक घटक आहेत. असे असतानाही त्यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला यापुढे नामुष्कीला सामोरे जावेच लागणार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. असे असतानाही नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हे शेकापच्या कार्यक्रमात एकत्र लढण्याची भाषा करणार असल्यामुळे डबल ढोलकीचा खेळ चालला असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.