
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे;
दळवट येथील सेंद्रिय शेती कार्यशाळेत आमदार नितीन पवार यांचे आवाहन..
सुरगाणा प्रतिनिधी l कृष्णा पवार:- दिनांक 1ऑगस्ट 2025 रोजी दळवट तालुका कळवण येथे कळवण व सुरगाणा मतदारसंघाचे आमदार मा.नितीन अर्जुन (ए.टी.) पवार यांचे अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेतीबाबत कृषी विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणातून मा. आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणेबाबत उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले.आदिवासी भागातील बरेचसे शेतकरी हे रासायनिक खताचा वापर न करता किंवा कमी वापर करून शेती करत असल्याने उत्पादित नागली, वरई,भात, स्ट्रॉबेरी, इत्यादी पिके नाशिक सारख्या शहरात नेऊन विक्री केल्यास निश्चितच बाजार भाव जास्त मिळेल असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पंधरा दिवसातून किमान एक दिवस गावात एकत्र येऊन शेतीबाबत नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व इतर सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे आवाहन केले.सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडे जमीनधारणा कमी होत असल्याने उपलब्ध जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी संरक्षित शेतीला पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी शेडनेट हाऊस, पॉली हाऊस मधील उच्च तंत्रज्ञान आधारित शेती करण्याबाबत सांगितले तसेच तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे भेट द्यावी .सोशल मीडिया, युट्युब, व्हाट्सअप ग्रुप यांच्या माध्यमातून शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबाबत सांगितले.प्रकल्प संचालक आत्मा नाशिक श्री अभिमन्यू काशीद यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आत्मा यंत्रणे मार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन व राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान याबाबत कळवण व सुरगाणा तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत माहिती दिली कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथील शास्त्रज्ञांनी सेंद्रिय शेती बाबत सखोल मार्गदर्शन केले.सदर वेळी आमदारांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण योजनांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविगीय कृषी अधिकारी श्री अशोक डमाळे व सूत्रसंचालन श्री राजेंद्र सावंत यांनी केले सदर कार्यक्रम प्रसंगी कळवण नगराध्यक्ष श्री कौतिक पगार, नारायणनाना हिरे ,राजेंद्र भामरे , धनंजय पवार, मधुकर जाधव तालुका कृषी अधिकारी कळवण श्री राजेंद्र गावित, तालुका कृषी अधिकारी सुरगाणा ज्ञानदेव तीखे ,तसेच सुरगाणा व कळवण तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी व कळवण सुरगाणा तालुक्यातील एक हजार हून अधिक शेतकरी बांधव उपस्थित होते.