logo

न्यायासाठी धाव घेतलेल्या पोलीस ठाण्यातच निरपराध तरुणाला बेदम मारहाण

पेण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक फौजदाराने केला महाभयंकर प्रकार; मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलीस निरीक्षकांची टाळाटाळ

पनवेल : राज भंडारी

मे महिन्यात आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी पेण बस स्थानकात कृष्णा सोनवणे हे आपल्या मुलीसोबत एसटी बसमध्ये चढताना धक्काबुकीचा प्रकार घडला, मात्र धक्का कोणी मारला हे नक्की माहित नसताना देखील कृष्णा सोनवणे यांनी धक्का मारल्याच्या गैरसमजातून एका सहप्रवाशाने त्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. प्रकरण यावरच न थांबता दोन्ही सहप्रवाशी पेण पोलीस ठाण्यात दाखल होताच, ज्या सोनवणे या तरुणाला नाहक मारहाण झाली त्यालाच कोणतीही तक्रार नसताना पोलीस ठाण्यात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार रविंद्र ज्ञानेश्वर ढोबळे यांनी बेदम मारहाण केल्याने पिडित तरुणाच्या गळ्याला तसेच पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. याबाबत या तरुणाने पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे न्यायाची मागणी केली असता, पोलीस प्रशासनाने मात्र गेले ३ महिने या तरुणाच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली. अखेर या तरुणाने आपल्या पत्नीसह सोमवारी जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयाबाहेर न्यायाची प्रतीक्षा मागण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान या परिवाराला पाठिंबा देण्यासाठी पँथर आर्मीचे सुशील जाधव आणि आरपीआयचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुफयान मुकादम हे देखील त्यांच्यासोबत आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी संबंधित सहाय्यक पोलीस फौजदार रविंद्र ढोबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे तसेच या अधिकाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी सोनवणे कुटुंबाने प्रसिद्ध माध्यमांसमोर बोलताना केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कृष्णा दत्तात्रेय सोनावणे, वय-४५ वर्षे हे वाशी येथे पत्नी सौ. साक्षी वय-३८, मुलगी रागिणी, मुलगी पुजा व आई-वडील असे राहण्यास असून दिनांक १२ मे रोजी बुद्धिपौर्णिमेनिमित्त पनवेल येथील नातेवाईकांकडे जाण्यासाठी पेण बसस्थानकात आल्यानंतर अलिबागकडून पनवेलकडे जाणाऱ्या बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाल्याने सोनवणे हे मुलीला घेवुन बसमध्ये चढू लागले. यावेळी त्यांच्यापुढे दरवाज्याच्या मध्य भागातून १ प्रवासी १ वर्षाची मुलगी घेवुन बसमध्ये चढत होता. बसमध्ये चढताना सर्वच प्रवासी घाई करीत होते. त्यामुळे सदर प्रवाशास मागील माणसाचा धक्का लागला आणि लागलीच त्या सहप्रवाशाने कृष्णा सोनावणे यांच्या मुलीने कानाखाली मारल्याचा आरोप करीत मोठमोठ्याने आरडा ओरड करू लागला. यावेळी सोनवणे यांनी त्या सहप्रवाशाला समजविण्याचा प्रयत्न केला असता संबंधित सहप्रवाशाने कृष्णा सोनवणे यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सोनवणे हे विव्हळत त्याला एस.टी. स्थानकामधील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यास सांगत होते. मात्र तरीही तो प्रवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे अखेर हे प्रकरण पेण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं.

पेण पोलीस ठाण्यात जेव्हा कृष्णा सोनावणे आपल्या परिवारासोबत पोहोचले, तोपर्यंत संबंधित सहप्रवाशाचे नातेवाईक आणि मित्रपरिवार आधीच पोलीस ठाण्यात हजर होते. सोनवणे हे याठिकाणी गेल्यानंतर या सर्व नातेवाईकांनी त्यांना घेराव घालून नाव आणि पत्ता विचारत 'तु वाशी गावातला आहेस तुला खरोशी गावातुन मुले आणुन तुझ्या गावात येवून मारु' अशी धमकी सुद्धा पोलीस ठाण्याच्या आवारात दिली. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात सहाय्यक पोलीस फौजदार आर.डी. ढोबळे समोर उभे असतानाही या धमकी देणाऱ्यांना काहीही न बोलता कृष्णा सोनवणे यांनाच गलपट्टी पकडून पोलिस ठाण्यात घेऊन गेले, याठिकाणी त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती देखील यावेळी सोनवणे कुटुंबियांनी माध्यमांसमोर स्पष्ट केली.

यावेळी सहाय्यक पोलीस फौजदार ढोबळे यांना सोनवणे यांनी सिसिटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबी तपासून पाहण्याचा सल्ला देताच सहाय्यक पोलीस फौजदार आर.डी. ढोबळे यांनी सोनवणे यांचे काहीही ऐकून न घेता सोनवणे यांना त्यांच्या पत्नी व मुलींसामोरच भडव्या, महारड्या तुला जास्तच माज आला आहे, अशा पद्धतीची भाषा करून लाथाबुक्क्यानी मारहाण करू लागले. आर.डी. ढोबळे यांनी केलेल्या मारहाणीमुळे सोनवणे यांना उभेही राहता येत नव्हते व तसेच त्यांना चक्कर येवु लागली होती. सोनवणे यांची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच ढोबळे यांनी सोनावणे यांच्या पत्नीला त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. कोणतीही तक्रार नाही, कोणता गुन्हा नाही तरीही नाहक मारझोड यावेळी सोनवणे यांना करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणानंतर सोनवणे यांना १५ ते २० दिवस वेगवेगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जाऊन उपचार घ्यावे लागले असल्याचेही त्यांनी वैद्यकीय दाखले दाखवून समोर आणले.

कायदयाचे रक्षण करणाऱ्या सहाय्यक पोलीस फौजदार आर.डी. ढोबळे यांच्याकडून सोनवणे यांच्यावर अन्याय झाला असून सहाय्यक फौजदार आर.डी. ढोबळे यांच्याविरुध्द मारहाण व जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी अनुसुचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करुन सोनवणे कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी कृष्णा सोनवणे व त्यांची पत्नी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे सोमवारपासून आमरण उपोषणाला बसले आहे. यावेळी सोनवणे यांच्यावर केलेल्या चुकीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी पँथर आर्मीचे सुशील जाधव आणि आरपीआयचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुफयान मुकादम हे देखील या आमरण उपोषणास पहिल्याच दिवसापासून सामील झाले आहेत.

कोट
पोलीस ठाणे हे न्यायाचे मंदिर आहे, सर्वसामान्य माणूस हा सहजासहजी पोलीस ठाण्याची पायरी चढत नाही, त्याला खरोखर न्यायाची गरज असते म्हणून तो त्याठिकाणी जातो. मग जर पोलीस ठाण्यात जाऊन सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला नाही तर त्या माणसाने न्याय कोणाकडे मागावा. माझ्या नवऱ्याची अशी परिस्थिती ढोबळे या पोलीस अधिकाऱ्याने केली होती की माझ्या नवऱ्याला स्वतःच्या पायावर उभे सुद्धा राहायला येत नव्हते. यावेळी त्यांच्या जीव गेला असता आणि माझ्या मुलीची मेंटली परिस्थिती बिघडली असती तर मी न्याय कोणाकडे मागितला असता.
- पिडीत कृष्णा सोनावणे यांची पत्नी

कोट
१२ मे रोजी पेण बस स्थानकात प्रवाशांमध्ये आपसात वाद झाला. हा वाद पेण पोलीस ठाण्याच्या पायरीपर्यंत पोहोचला. यावेळी पोलिसांकडून दोन्ही बाजू समजून घेऊन चुकीच्या माणसांवर कारवाई करणे गरजेचे असते. मात्र पेण पोलीस ठाण्यात जो प्रकार घडला आहे, त्यामध्ये सहाय्यक पोलीस फौजदार ढोबळे यांनी सोनावणे यांना गलपट्टीला पकडून पोलीस ठाण्यात डांबून ठेवलं. त्यांना बेदम मारहाण केली यामध्ये ते ५ दिवस ऍडमिट होते. आज अडीच महिने ते कामावर रुजू होऊ शकले नाहीत ज्यामुळे त्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले आहे. पेण पोलीस ठाण्यात ढोबळे यांनी सोनावणे यांना महारड्या असे संबोधून सोनावणे या एका व्यक्तीला दोष दिला नाही तर संपूर्ण समाजाला दोष दिला आहे. या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करून ढोबळे यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही भीम संघटना संपूर्ण रायगड जिल्ह्यात रस्त्यावर उतरवू.
- सुशील जाधव, पँथर आर्मी, महाराष्ट्र

कोट
पोलीस ठाण्यासारख्या ठिकाणी जातीयवाद होत असल्याची घटना समोर आल्याचे सर्वप्रथम दुःख वाटतं. ज्या ठिकाणी पोलीस हे जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत, त्याठिकाणी पोलीस गुंडाची भूमिका बजावताना दिसत आहेत. सोनावणे कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही, तर संपूर्ण रायगड जिल्हा आरपीआय पक्षाच्या वतीने घेरला जाईल.
- सुफयान मुकादम, उपाध्यक्ष, आरपीआय रायगड जिल्हा

9
6706 views