logo

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे रब्बी ज्वारीचे दोन सुधारित वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारीत

राहुरी विद्यापीठ, दि. 5 ऑगस्ट, 2025 महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या नेतृत्वाखाली, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाने महात्मा फुले कृषि विद्यापीठातील ज्वारी सुधार प्रकल्पाचे प्रमुख डॉ. विजू अमोलिक आणि त्यांचे शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नाने रब्बी ज्वारीचे एस. पी. व्ही. 2919 व एस. पी. व्ही. 2751 हे दोन वाण राष्ट्रीय स्तरावर निवड समितीकडून प्रसारीत करण्यात आले आहे. रब्बी ज्वारीवर भाकृअप-भारतीय श्री अन्न संशोधन संस्था, हैद्राबाद येथे नुकतेच राष्ट्रीय स्तरावरची ज्वारीची वार्षीक आढावा बैठक संपन्न झाली. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कृषि शास्त्र विभागाचे उपमहासंचालक डॉ. डी.के. यादव उपस्थित होते. या प्रसंगी देशभरातील शास्त्रज्ञ उपस्थित होते. यावेळी या सर्वांच्या उपस्थितीत महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले एस. पी. व्ही. 2919 व एस. पी. व्ही. 2751 हे दोन वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारीत करण्यात आले. महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित ज्वारी सुधार प्रकल्प हे राज्यातील रब्बी हंगामामधील ज्वारी संशोधनाचे प्रमुख केंद्र असून येथे ज्वारी पिकाचे संशोधन करुन त्यामधून जमीनीच्या प्रकारानुसार हलक्या, मध्यम व भारी जमीनीसाठी ज्वारीच्या उपपदार्थानुसार व कडबा गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिने नविन वाण विकसित केले जातात. ज्वारी सुधार प्रकल्प येथील प्रक्षेत्रावर रब्बी हंगामामध्ये कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली, भारतीय श्रीअन्न संशोधन संस्था हैद्राबाद (IIMR-Hyderabad) यांचे मार्गदर्शनाखाली ज्वारी पीकाचे विविध प्रयोग घेतले जातात. या संशोधनातून रब्बी ज्वारीचे एस.पी.व्ही. 2919 व एस. पी. व्ही. 2751 हे दोन वाण राष्ट्रिय स्तरावर निवड समितीकडून प्रसारित करण्यात आले. त्यापैकी एस.पी.व्ही. 2919 हा वाण भारी जमीनीसाठी महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या तीन राज्यांमध्ये जिरायत लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. या वाणाचे हेक्टरी उत्पादन 29.26 क्वि. प्रति हेक्टरी आणि कडब्याचे उत्पादन 80.58 क्वि. प्रति हेक्टरी इतके आहे. हा वाण धान्य व कडबा उत्पादनामध्ये उत्कृष्ट असल्याचे निवड समितीच्या निष्कर्षास आले तसेच हा वाण रोग व कीडींसाठी प्रतिकारक आहे. त्याचप्रमाणे एस.पी.व्ही. 2751 हा वाण हलक्या जमीनीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. या वाणाचे हेक्टरी उत्पादन 23.01 क्वि. प्रति हेक्टरी आणि कडब्याचे उत्पादन 88.82 क्वि. प्रति हेक्टरी इतके आहे. भारतीय श्रीअन्न संशोधन संस्था हैद्राबाद येथील संचालक डॉ. तारा सत्यवती व प्रकल्प निर्देशक डॉ. आर. मधुसुदन यांचेही या वाणांच्या निर्मितीमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. यानिमित्त वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. व्ही. एल. अमोलिक यांनी प्रकल्पात कार्यरत असलेले सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. ज्वारी सुधार प्रकल्पाचे दोन वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारीत झाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी अभिनंदन केले.

12
10 views