logo

चिखलीत पोलिसांची लाचखोरी उघड ...

फिल्ममेकरकडून लाखोंची मागणी केल्याप्रकरणी पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल

चिखली /सत्य कुटे :
             जिल्ह्यात कायद्याचे रक्षकच भक्षक ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार चिखली येथे उघडकीस आला आहे. चित्रपट निर्मिती व्यवसायातील कर्नाटकमधील एका युवकाकडून लाच मागणाऱ्या पाच पोलिसांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण पोलीस दलात आणि जिल्ह्यात मोठीच खळबळ उडाली आहे.
          सदर घटना ही कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील चल्लेकेरे येथील गांधीनगरमधील २३ वर्षीय फिल्ममेकर ताज अब्दुल रहेमान रहमततुल्ला यांच्यासोबत घडली आहे . चिखली परिसरात आलेल्या या युवकाकडून सुरुवातीला १,५०० रुपये उकळण्यात आले आणि नंतर पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पोलिसांच्या या दबावामुळे भीतीने धांदल उडाल्याने सदर युवकाच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती आहे.
          या प्रकरणात ताज यांनी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ६ ऑगस्ट रोजी अप.क्र. ६१०/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०८(२), ३०८(३), ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
      पीडित युवक परराज्यातील असल्यामुळे त्यांना संबंधित पोलिसांची नावे किंवा पदे माहीत नव्हती, त्यामुळे तक्रारीत त्यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
          ही गंभीर बाब जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या निदर्शनास येताच  त्यांनी तत्काळ कारवाई करत वाहतूक शाखा व चिखली पोलीस ठाण्याशी संबंधित पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर करत आहेत.
           या घटनेनंतर चिखलीसह संपूर्ण जिल्ह्यात पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेमध्येच काही भ्रष्ट कर्मचारी असल्याची चर्चा जनतेत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

6
802 views