
शाश्वत शेतीच्या माध्यमातून सदा हरित क्रांतीची संकल्पना डॉ. स्वामिनाथन यांनी मांडली - विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे
राहुरी विद्यापीठ, दि. 7 ऑगस्ट, 2025 भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस आपण शाश्वत शेती दिन म्हणुन साजरा करत आहोत. डॉ. स्वामिनाथन यांनी संशोधन करुन गहू व भाताचे अधिक उत्पादन देणारे वाण विकसीत केले. या संशोधीत वाणांमुळे आपल्या देशात हरित क्रांती आली आणि देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला व आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. यानंतर पर्यावरणाचा र्हास न होवू देता जैवविविधतेचे संवर्धन करुन शाश्वत शेतीची संकल्पना त्यांनी मांडली. यालाच ते हरित क्रांतीतून सदा हरितक्रांती असे म्हणत असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या जन्मदिन शताब्दी निमित्त शाश्वत शेती दिन कार्यक्रमाचे आयोजन कोंढवड येथे श्री. दत्तात्रय केशव म्हसे यांच्या प्रक्षेत्रावर करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वनस्पती रोगशास्त्र व कृषि अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र गायकवाड, एकात्मिक शेती संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उल्हास सुर्वे, वरिष्ठ कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. आनंद चवई, कीटकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मंगेश बडगुजर, कापूस सुधार प्रकल्पाचे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भुते, राहुरीचे तालुका कृषि अधिकारी श्री. बापुसाहेब शिंदे, शिलेगावचे सरपंच श्री. पांडुरंग म्हसे, कोंढवड येथील विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. उत्तमराव म्हसे, प्रगतशील शेतकरी श्री. साहेबराव म्हसे श्री. दत्तात्रय म्हसे उपस्थित होते.
याप्रसंगी शाश्वत शेती दिनानिमित्त विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. रविंद्र गायकवाड यांनी शाश्वत शेतीमध्ये फुले सुपर बायोमिक्सचा वापर, डॉ. पवन कुलवाल यांनी कापुस पिकाच्या अधिक उत्पादनासाठी वाढ व्यवस्थापन तंत्रज्ञान, डॉ. उल्हास सुर्वे यांनी शाश्वत शेती, डॉ. मंगेश बडगुजर यांनी ऊस पिकातील हुमणी अळी व पांढरी माशी व्यवस्थापन, डॉ. नंदकुमार भुते यांनी कापुस पिकातील एकात्मिक किड व्यवस्थापन या विषयांवर शेतकर्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी श्री. बापुसाहेब शिंदे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी शेतकर्यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेट देवून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार श्री. अशोक गिरगुणे यांनी मानले. या कार्यक्रमास कोंढवड येथील पद्मावती शेतकरी गटाचे शेतकरी सदस्य, कोंढवड पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.