
एनसीसीमुळे व्यक्तीमत्व विकास होतो व जीवन शिस्तबध्द होते- कर्नल प्रसाद मिजार
राहुरी विद्यापीठ, दि. 8 ऑगस्ट, 2025 एनसीसीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक कॅडेटच्या जीवनात शिस्तबध्दता येते. कॅडेटच्या चालण्यात, बोलण्यात, आचारणात अमुलाग्र बदल होतो व देशप्रमाची भावना व देशाप्रती आदरभाव जागृत होतो. एनसीसीमध्ये सहभागी झालेले कॅडेट यांना सैन्यदलात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध होते. एनसीसीमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होवून जीवनात शिस्तबध्दता येते असे प्रतिपादन 17 महाराष्ट्र बटालियन (एनसीसी) चे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रसाद मिजार यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठात वार्षिक एनसीसी प्रशिक्षण शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करतांना कर्नल प्रसाद मिजार बोलत होते. याप्रसंगी सुभेदार मेजर राजेश कुमार, सुभेदार श्रीकांत मोरे, सुभेदार मुकेश सिंग, सुभेदार राकेश कुमार, कॅप्टन सुनील फुलसावंगे, लेफ्ट. सतीश चोरमले, टी.ओ. नर्मता गागरे, सीटीओ पुजा पाटील, बाबूजी म्याना, प्रतीक शिंदे, नवनाथ जोगदंड आदी उपस्थित होते.
कर्नल मिजार पुढे म्हणाले, सशस्त्र दलात सजग व शिस्तप्रीय तरुणांची गरज आहे. एनसीसी हा केवळ एक अभ्यासक्रम नसून एक जीवनशैली आहे. त्यामुळे आज एनसीसीचा गणवेश परिधान केलेला प्रत्येक कॅडेट उद्या भारतीय लष्कराच्या गणवेशात दिसावा, हीच अपेक्षा आहे. या शिबिराला छ. संभाजीनगर येथील एनसीसी गृप कमांडर अनुप गजानन बरबरे यांनी भेट दिली. यावेळी अनुप बरबरे म्हणाले शिस्तीमुळे जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. शिबिरामध्ये जी शिस्त अंगिकारली आहे ती इतरांना देखील शिकवावी. या शिबिरात प्रथमच ड्रिल स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या ड्रिल स्पर्धेमध्ये चार कंपन्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये ब्राहो कंपनी विजेती ठरली तर अल्फा कंपनी रनर ठरली. या शिबिरात जिल्ह्यातील 29 महाविद्यालयांचे सुमारे 350 कॅडेट्स सहभागी झाले आहेत. दहा दिवस चालणार्या या निवासी शिबिरात त्यांना सैनिकी व व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात कॅडेट्सना फिजिकल ट्रेनिंग, शस्त्रप्रशिक्षण, फिल्ड व बॅटल क्राफ्ट, नकाशा वाचन, ड्रिल यांसारखे लष्करी विषय शिकवले जाणार आहेत. याशिवाय व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य व स्वच्छता, सामाजिक सेवा, राष्ट्रीय एकता, आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार यासारख्या उपयुक्त विषयांचाही समावेश आहे. शिबिरात भारतीय लष्करातील अधिकारी, पर्मनंट इन्स्ट्रक्टर तसेच एनसीसी अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शिबिरामध्ये सहभागी होणार्या विद्यार्थ्यांना सैन्य प्रशिक्षणाबरोबरच समाजसेवेचे मूल्यही शिकवले जात असून, त्यातून जबाबदार व देशभक्त नागरिक घडवण्याचे कार्य एनसीसीच्या माध्यमातून होत आहे.