logo

जनता विद्यालयात क्रांती दिन साजरा


पिंपळगाव सराई, (बातमीदार) : जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव सराई येथे शुक्रवार, ९ ऑगस्ट २०२५ रोजी 'क्रांती दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आठवीचा विद्यार्थी विनय खुर्दे याने अध्यक्षस्थान भूषवले. कलाशिक्षक रवींद्र खानंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात वैशाली मांजाटे दिग्दर्शित 'ऑगस्ट क्रांती दिन' या पथनाट्याने झाली. या प्रभावी सादरीकरणानंतर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीते सादर केली, ज्यामुळे वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगून गेले.

प्रमुख वक्ते रवींद्र खानंदे यांनी आपल्या भाषणात १९४२ च्या 'भारत छोडो आंदोलना'चे महत्त्व विषद केले. ते म्हणाले की, या आंदोलनाने स्वातंत्र्यलढ्याला नवे बळ दिले. महात्मा गांधींच्या 'करो या मरो' या घोषणेने आजही आपल्याला कर्तव्य आणि देशभक्तीची प्रेरणा मिळते. त्यांनी विद्यार्थ्यांना देशाचे भविष्य असल्याचे सांगून प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात विद्यार्थी विनय खुर्दे म्हणाला की, क्रांती दिन हा केवळ आठवण नाही, तर स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचा सन्मान आहे. प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातून प्रेरणा घेऊन देशासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

पर्यवेक्षक संजय पिवटे यांनी, "आज तुम्ही जे स्वातंत्र्य उपभोगत आहात, ते अनेकांनी प्राणपणाला लावून मिळवले आहे. त्यांचा आदर करा आणि देशाला प्रगतिपथावर न्या," असे सांगितले.
याप्रसंगी घेण्यात आलेल्या देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचा निकालही जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा. सुधाकर सास्ते आणि पंजाब गायकवाड यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवीच्या विद्यार्थिनी अनुष्का व धनश्री यांनी केले. नेहा गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य प्रमोद ठोंबरे, पर्यवेक्षक संजय पिवटे, कार्यक्रम प्रमुख सुहास कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

91
4729 views