
लिंग भाव समानतेचा सशक्त प्रवास
ग्रामीण महिलां सोबत संवाद आणि जागृती
लिंग भाव समानतेचा सशक्त प्रवास
ग्रामीण महिलां सोबत संवाद आणि जागृती
अमळनेर प्रतिनिधी
जुलै 2025 मध्ये आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर मार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वामींनी प्रकल्प अंतर्गत अमळगाव, मठगव्हाण, दहिवद आणि रुंधाटी या गावांमध्ये लिंग भाव समानता, जेंडर इक्वालिटी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये साधनव्यक्ती म्हणून दर्शना पवार यांनी उपस्थित महिलांशी अतिशय जिव्हाळ्याने आणि सखोल संवाद साधला.
या प्रशिक्षणांची विशेषता म्हणजे त्यांनी स्थानिक धार्मिक व सांस्कृतिक उदाहरणांचा वापर करून लैंगिक समानतेसारखा गंभीर विषय अतिशय सहज आणि भावनिक पद्धतीने समजावून सांगितला.
अमळगाव आणि मठगव्हाण येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात, विठ्ठल-रुख्मिणी यांच्या सहजीवनाचे उदाहरण देत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश त्यांनी प्रभावीपणे दिला. त्या म्हणाल्या, "देवाच्या मूर्तींपासून आपण समतेचा अर्थ शिकतो, मग समाजात भेदभाव का करतो?"
दहिवद व रुंधाटी येथील महादेव मंदिरामध्ये, महादेव-पार्वतीच्या माध्यमातून विविधतेतील एकता, परस्पर आदर आणि समानतेचे मूल्य अधोरेखित केले.
प्रशिक्षणा दरम्यान साधन व्यक्ती
दर्शना पवार यांनी स्वतःच्या जीवनातील संघर्ष, अनुभव मोकळेपणाने मांडले. समाज, कुटुंब आणि स्वतःशी झगडत त्यांनी पार केलेला प्रवास अनेक महिलांना आत्मभान आणि प्रेरणा देणारा ठरला.
मासिक पाळी या विषयावर त्यांनी अत्यंत संवेदनशील आणि स्पष्ट संवाद साधला. अजूनही समाजात असलेल्या गैरसमजांमुळे महिलांना भोगावे लागणारे अपमान, लज्जा याविषयी त्यांनी उघडपणे संवाद साधला. या वेळी अनेक महिलांनी स्वतःच्या भावना, सल व्यक्त करत सहभाग घेतला.
मूल न होणाऱ्या महिलांबाबत समाजाचा दृष्टिकोन हा प्रशिक्षणातील एक भावनिक टप्पा ठरला. "बाळ न होणं" त्यात स्त्री चा दोष नाही," असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी स्त्रियांविषयी असलेल्या अपूर्णतेच्या चुकीच्या कल्पनांचा निषेध केला. यावेळी काही महिलांनी अश्रूंमधून आपल्या व्यथा शेअर केल्या. यात महिला भावुक झाल्यात व त्यांच्या मनातील वेदना त्यांनी अनुभवातून मांडल्या.
महिलांच्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला. त्या म्हणाल्या, "घरकाम, शेती, मुलांचे संगोपन" हे सर्व 'काम'च आहे. स्वतःचा आदर आपण स्वतःच केला पाहिजे; दुसरं कोणी आपली किंमत सांगेल, अशी वाट पाहू नका."
या संपूर्ण प्रशिक्षणात ज्ञान, अनुभव, भावनिक उलगडणी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रम फक्त माहितीपुरता न राहता, महिलांच्या मनात आत्मविश्वास आणि समानतेची नवी जाणीव जागवणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी, दर्शना सरला अरुण पवार यांनी स्वतः लेखन केलेले 'प्रवास आनंदी सहजीवनाचा' हे प्रेरणादायी पुस्तक सर्व प्रशिक्षणार्थी महिलांना आधार संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आले.
या प्रशिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गावातील CRP, पशु सखी, कृषी सखी, तसेच आधार संस्था अध्यक्ष डॉ भारती पाटील, संचालिका रेणू प्रसाद,स्वामींनी प्रकल्पाचे समन्वयक मुरलीधर बिरारी व उर्जीता शिसोदे यांनी विशेष परिश्रम घेतले.