
लोकशाही धोक्यात: माण-खटावमध्ये कार्यकर्ते, पत्रकारांवर खोट्या गुन्ह्यांचा आरोप;राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
सातारा (म्हसवड, ता. माण )–
माण व खटाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली पोलीस प्रशासन सामाजिक, राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाऊ भोजलिंग सोनवणे यांनी केला आहे. या निषेधार्थ ते १५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रांत कार्यालय, दहिवडी समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडूज, दहिवडी आणि म्हसवड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत निष्पाप नागरिकांना अटक, खोट्या FIR नोंदी व मानसिक त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक प्रकरणांत न्यायालयांनी पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे ओढून आरोपींना जामीन मंजूर केला असतानाही ही पद्धत थांबत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात पुढील प्रमाणे प्रमुख आरोप व मागण्या मांडण्यात आल्या आहेत
स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या सूडबुद्धीने गुन्हे दाखल होत आहेत.
पोलीस यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत असून विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तालुक्यात चोरी व दरोड्यांचे प्रमाण वाढले असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
दोन ते तीन वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत व राजकीय वरदहस्ताने टिकून असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी.
खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी, दोषींवर कारवाई, पीडितांना संरक्षण व भरपाई, पोलिसांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि “लोकशाही व नागरी हक्क संरक्षण समिती” स्थापन करण्याची मागणी.
सोनवणे यांनी इशारा दिला आहे की, मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. या निवेदनाची प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना पाठविण्यात आली आहे.