logo

जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर तळीरामांचा उच्छाद; नागरिक त्रस्त, पोलिसांकडे कारवाईची मागणी

अहमदपूर : शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर तसेच परिसरात तळीरामांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. रस्त्यावरच दारू पिणे, उघड्यावर लघुशंका करणे आणि महिलांना त्रास देणे अशा प्रकारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही पोलिस कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, या परिसरात एक मशीद, गणपती मंदिर, यशवंत विद्यालय आणि महाविद्यालय आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला, विद्यार्थिनी, व्यापारी आणि भाविकांना तळीरामांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दारूच्या नशेत हे तळीराम एकमेकांशी वाद घालतात, अश्लील शिवीगाळ करतात आणि मारामारी करतात.
या भागातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात अवैद्य दारू विक्री होत असल्यामुळे ही समस्या वाढली आहे. पोलिसांना याविषयी माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, महिला आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन, तळीरामांवर आणि अवैद्य दारू विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

10
922 views