धाराशिवः भरधाव कंटेनरची जोरदार धडक; तरुण जागीच ठार, चालक नागरिकांच्या मदतीने पकडला
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयासमोर रविवारी सकाळी साडेदहा वाजता भीषण अपघात झाला. सारोळा (ता. धाराशिव) येथील सिद्धार्थ रामचंद्र कठारे (वय ३५) हे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत कठारे यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर कंटेनर चालक वाहनासह पसार होण्याचा प्रयत्न करीत असताना घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्परतेने पाठलाग करून वडगावजवळ चालकाला पकडले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंदणी सुरू होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.