logo

नोकरीसाठी पैशासह बनावट अर्जावर घेतल्या सह्या


- तोतया 'पीए'कडून फसवणूक प्रकरण



जळगाव : तोतया स्वीय सहायक हितेश

रमेश संघवी (४९, मूळ रा. नेहरूनगर, जळगाव, ह.मु, मुंबई) याने रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावून देण्यासाठी पैसे घेण्यासह बनावट अर्जावर (फॉर्म) संबंधितांच्या सह्यादेखील घेतल्या. मात्र, एका जणालाही नोकरी मिळाली नाही. विशेष म्हणजे पैशाचा तगादा वाढल्याने त्याने स्वतःच आपण एकनाथ शिंदे यांचा पीए नसल्याचे तक्रारदारांना सांगितले.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत हितेश संघवी व त्याची पत्नी अर्पिता हितेश संघवी (४५) या दाम्पत्याने १८ जणांची ५५ लाख ६० हजार रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यांच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली असून, एक पथक जिल्ह्यात तर दुसरे पथक जिल्ह्याबाहेर शोध घेत आहे. दरम्यान, या फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी फसवणूक झालेल्या १८ जणांचे साक्षीदार म्हणून सोमवारी (११ ऑगस्ट) जबाब नोंदवून घेतले आहेत.

खरे भासविण्यासाठी अर्जावर घेतल्या सह्या

१ कोणाचा मुलगा, मुलगी, भाचा यांना रेल्वेत टीसीची नोकरी लावून देण्यासह रेल्वे विभागात टेंडर मिळवून देणे व भुसावळ डीआरएम कार्यालयात भाडे तत्त्वावर वाहन लावणे, बँकेकडून कर्ज मंजूर करून घेणे, म्हाडाचे फ्लॅट मिळवून देणे, अपघात विमा मंजूर करून देणे, अशा वेगवेगळ्या कारणांनी संघवी याने मोठी रक्कम उकळली.

रक्कम दिली, अर्ज दिले तरी एकालाही नोकरी न मिळाल्याने तक्रारदार संघवी याच्याकडे पैशाची मागणी करू लागले. यासाठी काही जण त्याच्या मुंबई येथील घरीही जाऊन आले. मात्र, तेथे तो नव्हता. काम होत नसल्याने पैसे परत मिळण्याचा तगादा वाढल्याने १२ मे २०२५ रोजी संघवी याने त्याच्या पत्नीच्या मोबाइलवरून दीपक बारी यांच्याशी संपर्क साधून मी एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहायक नाही, मी त्यांचे बाहेरचे कामे करतो, तुम्हाला चुकीची माहिती दिली आहे, असे सांगितले.

या प्रकरणात कोणी फसवणुकीची तक्रार देण्यासाठी आल्यास त्याच्याकडून पुरावे घेऊन संबंधितांची साक्षीदार म्हणून तक्रार घेतली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

मरु

16
1673 views