
वनवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ठाण्यातील संस्थांचा उपक्रम
वैद्यकीय तपासणी शिबिर व वस्तूवाटप कार्यक्रम यशस्वी
ठाणे, दि. २६ जुलै २०२५ – वनवासी कल्याण आश्रम, ठाणे टीम व प्रेमकांत फाऊंडेशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच संचालिका सौ. जास्मिन शाह यांच्या पुढाकाराने, माणगाव येथील श्रीमती विजया गोपाल गांधी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत शनिवार, दि. २६ जुलै रोजी भव्य वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात डॉ. विक्रांत दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांसह सर्विन फाऊंडेशनच्या सौ. श्रेया कुमावत व त्यांच्या ७ पॅरामेडिक्सच्या टीमने सहभाग घेतला. तसेच महिला समन्वय कार्यासाठी प्रसिद्ध सौ. अंजली गांगल, हितचिंतक सौ. लतिका प्रधान व सौ. विनिता टिपणीस, ठाणे टीमतर्फे सौ. ज्योती जपे व सौ. मंगल शेळके उपस्थित होत्या.
सविस्तर आरोग्य तपासणी
शिबिरात पहिली-दुसरीतील विद्यार्थ्यांची सर्वसाधारण तपासणी, तिसरी-चौथीतील आजारी विद्यार्थ्यांची तपासणी, तसेच पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे उंची, वजन, रक्त तपासणी (BMI, प्रोटीन, हिमोग्लोबिन, टोटल बॉडी वॉटर, बॉडी फॅट इ.) करून वैयक्तिक अहवाल देण्यात आले. आवश्यक विद्यार्थ्यांना हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी औषधोपचारही करण्यात आले. तपासणी दुपारी साडेबारा वाजता सुरू होऊन सायंकाळी साडेपाचपर्यंत चालली.
दीर्घकालीन आरोग्य उपक्रम
वनवासी विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता सर्वसाधारण असल्याचे निदर्शनास आले असून, ती वाढविण्यासाठी डॉक्टरांची टीम दर तीन महिन्यांनी शाळेला भेट देणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी वस्तूवाटप
कार्यक्रमात पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुलींना नवीन, उच्च-गुणवत्तेचे फ्रॉक देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना राजगिरी लाडू व दुपारच्या जेवणात जिलेबीचा खाऊ देण्यात आला. तसेच शाळेच्या वॉचमनला नवीन युनिफॉर्म देण्यात आला.
डॉक्टरांचे विशेष कौतुक
डॉ. विक्रांत दळवी यांनी ठाणे ATC अंतर्गत ६० आश्रमशाळांमधील अनेक ठिकाणी तपासण्या केल्या असून, “माणगाव आश्रमशाळा ही सुविधांच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट आहे, येथे केलेल्या व्यवस्थापनाला आम्ही सलाम करतो,” असे कौतुकपर उद्गार काढले.
आरोग्य तपासणी व वस्तूवाटपाचा हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करून सर्वजण संध्याकाळी ठाण्यात परतले .