logo

तहसीलदार अक्कलकुवा यांना आदिवासी संघटनांचे निवेदन: कुटुंब पाहणीत अनुसूचित जाती-जमातीचा उल्लेख नसल्याने संताप

तहसीलदार अक्कलकुवा यांना आदिवासी संघटनांचे निवेदन: कुटुंब पाहणीत अनुसूचित जाती-जमातीचा उल्लेख नसल्याने संताप
अक्कलकुवा प्रतिनिधी (गंगाराम वसावे)
कुटुंब पाहणी सर्वेक्षण अहवालात अनुसूचित जाती-जमातीचा उल्लेख नसल्याने आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आदिवासी महासंघाचे सचिव जी.डी. पाडवी, सरपंच अश्विन तडवी, वसंत नाईक, निलेश पाडवी (शरद पवार गट तालुका अध्यक्ष), भगतसिंग नाईक विजेसिंग वसावे,अमरसिंग तडवी आणि संजय वसावे यांनी तहसीलदार अक्कलकुवा यांना निवेदन दिले आहे. यावेळी अक्कलकुवा तालुक्याचे गतविकास अधिकारी लालू पावारा ही उपस्थिति होते.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या कुटुंब पाहणी अहवालात आदिवासी जमातीचा उल्लेख दिसत नाही. सर्वेक्षण करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये केवळ हिंदू, मुस्लिम,ख्रिस्ती असे पर्याय उपलब्ध आहेत.यात अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांचा कोणताही उल्लेख नाही.यामुळे जनमानसात मोठा संभ्रम निर्माण झाला असून,आदिवासी समाजाची ओळखच पुसली जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. या गंभीर त्रुटीमुळे आदिवासी समाजाला न्याय मिळत नाहीये.या विषयावर तात्काळ खुलासा करून आदिवासी समाजाला न्याय द्यावा.जर या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले तर, आदिवासी विविध संघटनांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ही त्रुटी दूर करून आदिवासी समाजाचा उल्लेख सर्वेक्षण अहवालात समाविष्ट करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शासनाने या गंभीर विषयाची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन आदिवासी नेत्यांनी केले आहे.

15
396 views