logo

जनता विद्यालयात ‘हेल्पिंग हँड फाउंडेशन’ तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप


पिंपळगाव सराई, दि. १३ ऑगस्ट – येथील जनता विद्यालयात ‘हेल्पिंग हँड फाउंडेशन’च्या वतीने गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्रित येऊन हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे देविदास दळवी यांचे विशेष प्रयत्न लाभले. ‘हेल्पिंग हँड फाउंडेशन’चे सदस्य रवींद्र जाधव (मुंबई पोलीस), योगेश काळे (युनियन बँक ऑफ इंडिया), शैलेश मस्के (पीएसआय, जालना), भारत सावंत (आयटी इंजिनिअर), सतीश भराड (स्टेट बँक ऑफ इंडिया), वैभव काळे (आयटी प्रॅक्टिशनर), संतोष गवारे पाटील (शिवव्याख्याते), अॅड. प्रशांत भराड, सुमित सोनुने आणि शुभम सोळंकी यांच्या आर्थिक मदतीतून हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पर्यवेक्षक संजय पिवटे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात पिवटे सरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत परिश्रम, प्रामाणिकपणा आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे प्रेरणादायी विचार मांडले.

मार्गदर्शन करताना शिवव्याख्याते संतोष गवारे पाटील यांनी इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत चारित्र्य, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले.

प्रमुख पाहुण्यांमध्ये ज्येष्ठ शिक्षक रवींद्र खानंदे, सुदाम चंद्रे आणि प्रा. सुधाकर सस्ते यांचा समावेश होता. शाळेवर प्रेम करणारे माजी विद्यार्थी दीपक गवते आणि शिवम तरमळे यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन देविदास दळवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक प्रमुख सौ. वैशाली मांजाटे यांनी केले.

विद्यालयातील शिक्षकवर्ग, कर्मचारी, फाउंडेशनचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. शालेय बॅग मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी प्रेरणा मिळाली.

45
1738 views