जनता विद्यालयात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा
पिंपळगाव सराई, ता. जि . बुलढाणा – येथे असलेल्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रमोद ठोंबरे होते.कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य प्रमोद ठोंबरे व पर्यवेक्षक संजय पिवटे यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णांच्या प्रतिमा आणि दहीहंडीचे विधिवत पूजन करून झाली. या वेळी विद्यार्थ्यांचे ढोल पथक, दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले मनोरे, पारंपारिक आकर्षक वेशभूषा, तसेच राधा-कृष्ण यांच्या वेशभूषेत सजलेले विद्यार्थी हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित गीते, गवळणी व भजने सादर केली. ढोल-ताशांच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उस्फूर्त नृत्याने वातावरण आनंदमय झाले.या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी व नियोजन कार्यक्रम प्रमुख अविनाश सोलकर आणि वर्ग नववी ‘अ’च्या विद्यार्थ्यांनी केली. मंचावर पर्यवेक्षक संजय पिवटे, सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक सुदाम चंद्रे यांनी केले.