logo

जिल्हा चिकित्सकांचे सहा महिन्यांचे आश्वासन फोल; २५ ऑगस्टपासून तीव्र आंदोलनाचा इशारा



यवतमाळ – जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमधील मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी गुरुदेव युवा संघाकडून सुरू असलेले आमरण उपोषण जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते. मात्र, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उपोषण स्थळी आलेल्या जिल्हा चिकित्सकांनी फक्त लेखी स्वरूपातील आश्वासन पत्र देत “सहा महिन्यांत समस्या सोडवू” असे सांगितल्याने संघ आक्रमक झाला आहे.
संघाचे अध्यक्ष मनोज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर, रुग्णालयातील संडास-बाथरूमची स्वच्छता, रुग्णांना स्वच्छ गाद्या-बेडशीट उपलब्ध करून देणे, या छोट्या-छोट्या समस्याही सहा महिन्यांत सोडवल्या जातील असे सांगणं म्हणजे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ आहे. सहा महिने जर अशा प्राथमिक सुविधांसाठी लागणार असतील, तर जिल्हा चिकित्सकांनी तात्काळ राजीनामा देऊन जागा सक्षम अधिकाऱ्याला द्यावी.”
१५ ऑगस्टला झालेल्या या प्रसंगी संघाने “बंद करो ये भ्रष्टाचार” अशी गाणी लावून जिल्हा चिकित्सकांचा निषेध केला. संघाचा आरोप आहे की, जिल्हा चिकित्सक उपोषण सुरू असतानाही झेंडावंदन सोहळ्यात रमले, मात्र आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.
गुरुदेव युवा संघाने इशारा दिला आहे की, २५ ऑगस्टपर्यंत मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास उपसंचालक (आरोग्य), अकोला यांच्या दालनात तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यावेळी उपसंचालकांनाही विचारले जाईल की, जर प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी सहा महिने लागत असतील तर जिल्हा चिकित्सकांचा या पदावर काय उपयोग? तसेच या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडेही निवेदन देण्यात येणार आहे.

1
99 views