logo

मुंबईत दहीहंडी उत्सवात दुर्दैवी घटना ; मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू; 30 जखमी, उपचार सुरू

मुंबईत दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पहाटेपासून सुरू असून शहरभर ठिकठिकाणी गोविंदा पथके उत्साहात मनोरे रचताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते, अभिनेते, नृत्यांगना गौतमी पाटील यांसारख्या सेलिब्रिटींच्या उपस्थितीत विविध ठिकाणी उत्सवाला रंगत आली. मात्र, या जल्लोषात मानखुर्द येथे घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण उत्सवावर शोककळा पसरली आहे.

मानखुर्दमध्ये गोविंदाचा मृत्यू :

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. जगमोहन शिवकुमार चौधरी (३२) हा गोविंदा दहीहंडीचा रोप बांधताना तोल जाऊन खाली पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संबंधित बाल गोविंदा पथकात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

30 गोविंदा जखमी :

मुंबईतील दहीहंडी उत्सवात सकाळपासून विविध पथकांनी विक्रमांचे मनोरे रचण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या. आतापर्यंत एकूण ३० गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी १५ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून उर्वरित १५ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

उत्सवावर गालबोट :

दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होणारा दहीहंडी उत्सव यावेळीही जल्लोष, गाणी, नृत्य आणि नव्या विक्रमांची नोंद यामुळे गाजला. मात्र मानखुर्दमधील या दुर्दैवी अपघातामुळे उत्सवाला गालबोट लागले आहे. एका गोविंदाच्या मृत्यूने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून जखमी गोविंदांच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

6
29 views