
चाकूर तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!
दोन मजली वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन नामदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न
नवनाथ डिगोळे चाकूर प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील हनमंतवाडी येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या दोन मजली सुसज्ज वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन आज नामदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
ग्रामीण भागातील मागासवर्गीय मुला-मुलींना सुरक्षित, सुसज्ज आणि अभ्यासासाठी योग्य निवास व्यवस्था मिळावी, यासाठी ३० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. ही इमारत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सामाजिक उन्नतीचे केंद्र ठरणार आहे.
वसतिगृहाची वैशिष्ट्ये:
१०० मुलं व १०० मुलींसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था
दोन मजली आधुनिक इमारत
पहिल्या मजल्यावर १४ खोल्यांचा समावेश
सुसज्ज ग्रंथालय
स्वतंत्र अभ्यासिका
या वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक सोयीसुविधांसह सुरक्षित शिक्षणात्मक वातावरण मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बळ मिळणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती:
या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद्माकरराव पाटील, चाकूर नगराध्यक्ष करीमसाहेब गुळवे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळभाऊ माने, कार्यकारी अभियंता अलका डाके मॅडम, तसेच इतर अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, अशा योजनांमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संधींचा नवा उजेड मिळतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
नामदार बाबासाहेब पाटील यांचे मार्गदर्शन:
“विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणाना सोबत त्या शिक्षणासाठी योग्य सुविधा मिळणे ही काळाची गरज आहे. या वसतिगृहामुळे ग्रामीण आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळेल,” असे नामदार बाबासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात नमूद केले.