
तहसील कार्यालयातील कोतवालांना मूळ नियुक्ती, सज्जा ठिकाणी कर्तव्यावर पाठवा
चाकूर,प्रतिनिधी :
तालुक्यातील तहसील कार्यालय अंतर्गत जवळपास २८ नियुक्त कोतवाल पदावरील कर्मचाऱ्यांना त्यांना मूळ नियुक्त केलेल्या सज्जाच्या ठिकाणी कर्तव्यावर पाठवावे अशी मागणी डॉ अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात या संदर्भात राज्य शासनाने सर्व विभागीय आयुक्त यांना १६ आक्टोबर २०२४ रोजी काढलेल्या पत्रात कोतवालाच्या सेवा वरिष्ठ कार्यालयास सलग्नित न करता संबंधित त्या त्या सज्जास वर्ग करण्याबाबत म्हटले आहे. तसेच विभागीय आयुक्त यांनीही त्या पत्राच्या आधारे सर्व जिल्हाधिकारी यांना १८ आक्टोबर २०२४ रोजी कोतवालच्या सेवा वरिष्ठ कार्यालयास सलग्नित न करता संबंधित त्या त्या सज्जास वर्ग करण्याबाबत पत्राद्वारे कळविल्याचे म्हटले आहे. पुढे चाकूर तहसीलदार यांनी याबाबत त्यांच्या स्तरावर कार्यवाही केली नसल्याचे नमूद केले आहे.
कोतवालांना तहसील कार्यालयात दिवसभर कसलेच कामे नसतात.त्यांच्यावर शासनाच्या भरमसाठ पैशाचा बेसुमार चुराडा होत आहे.काही कोतवाल दहा वर्षांपासून तहसील कार्यालयातील महत्वाच्या विभागात बसून एका प्रकारे मालक बनले आहेत. पुरवठा विभागात असणारे कोतवाल अनेक वर्षांपासून एकाच विभागात कायमस्वरूपी नियुक्त करून त्यांना कुबेराचे धनी बनवले जात आहे. तात्काळ तेथून काढून त्यांना दिलेल्या मूळ सज्जावर पाठवून देवून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी असे म्हटले आहे.
कोतवालांना त्यांच्या मूळ ठिकाण असणाऱ्या सज्जावर पाठवावे, अन्यथा वरिष्ठाकडे या संदर्भात दाद मागून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदार यांना निवेदनात दिलेला आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष नितीन डांगे,पपन वैरागे, अभिषेक मोठेराव,परमेश्वर गायकवाड,अजय सिरसाठ,सागर कसबे,चंद्रकांत कांबळे,बालाजी लोंढे,रोहण कसबे,चेतन खटके,प्रेम गायकवाड,हर्ष गायकवाड,रुपेश घोडके आदीच्या स्वाक्षरी आहेत.