logo

नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा

अहिल्यानगर – आरोग्य विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी दक्षता आणि संवेदनशीलतेने काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिवकुमार वलांडे, जिल्हा माता–बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद काकडे, डॉ. फुंड, ॲड. सारिका सुरासे आदी उपस्थित होते. डॉ. आशिया म्हणाले की, जिल्ह्यात मुला–मुलींच्या लिंग गुणोत्तराचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील समित्यांनी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. मुलींच्या जन्माबाबत कार्यशाळांचे आयोजन करावे. अवैधरित्या गर्भलिंगनिदान करणाऱ्या केंद्रांवर माहिती मिळताच कडक कारवाई करावी. जिल्ह्यातील जन्म–मृत्यूची नोंद वेळेत व्हावी, याची काळजी घ्यावी. तसेच खासगी दवाखाने व प्रसूतीगृहांना नियमित भेटी देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत आवश्यक नोंदी संकलित कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. क्षयरोग निर्मूलनासाठी संशयित रुग्णांचे लवकर निदान आणि योग्य उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी क्षयरुग्णांच्या तपासणीची संख्या वाढवावी. सर्व रुग्णालयांमध्ये क्ष-किरण कॅम्पचे आयोजन करावे. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया अशा आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्र आणि मोठ्या गावांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियमित गृहभेटी घ्याव्यात. डास निर्मूलनासाठी कीटकनाशक फवारणी, साचलेले पाणी हटवणे आणि परिसर निर्जंतुक ठेवण्यावर भर द्यावा. शासकीय दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांची आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नोंदणी करावी. यासाठी आरोग्यमित्रांची मदत घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी नमो नेत्र संजीवनी, स्वस्थ नारी – स्वस्थ परिवार या अभियानांचा आढावाही घेतला. बैठकीस सर्व आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी तालुका दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

2
169 views